अरविंद गोखले
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी लिहिताना प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हटले होते की, टिळकांच्या आयुष्याचे दोन भाग सांगता येतील. म्हणजे त्यांच्या मते टिळक चरित्राचे दोन भाग पडतात. मंडाले पूर्व आणि मंडाले उत्तर. मंडालेनंतरचे टिळक हे अधिक प्रभावी आणि आक्रमक होते, हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ. पण आधीच्या काळातच टिळकांनाच राजद्रोहाच्या आरोपाखाली दोनदा तुरुंगात जावे लागले. काही गोष्टी त्यांच्याविषयी सांगितल्या जात नाहीत, पण आज त्यांच्या १०२ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सांगितल्याच पाहिजेत. त्यापैकी एक ही पुण्यात प्लेग पसरला तेव्हाची म्हणजे १८९७ ची आहे. त्यावेळीही प्लेग आला म्हणजे काहीतरी मोठे आक्रित आले आहे, असे समजले जात असे आणि त्यातून जीव वाचवायचा असेल तर बाहेरगावी गेल्यानेच तो वाचू शकतो, असे अनेकांना वाटले असेल, तर ते समजायला अवघड नाही. आपल्या पिढीने कोरोनाकाळ अनुभवला आहे. कोरोनात अशीच माणसांची पळापळ झाली. त्यातले काही तर रस्त्याने जाता-जाताच स्वर्गलोकी गेले. तेव्हा परिस्थिती आणखी बिकट होती. टिळकांनी त्या प्लेगच्या काळात स्वत:चे एक हॉस्पिटल उभारले होते. ते आताच्या संभाजी पुलापलीकडे म्हणजे सध्या जिथे जिमखाना मैदान आहे, त्याच्या जवळपास होते. त्याला जोडूनच त्यांनी एक मुक्तद्वार भोजनालयही सुरू केले. त्या हॉस्पिटलचे नाव जरी हिंदू हॉस्पिटल असले तरी तिथे सर्व जातीधर्माच्या रुग्णांची सोय केली जात होती. टिळक स्वत: त्या हॉस्पिटलमध्ये सकाळ, संध्याकाळ जात असत आणि रुग्णांची व्यवस्था लागते की नाही हेही पाहत. टिळकांना या हॉस्पिटलसाठी स्वयंसेवकांच्या मदतीची गरज होती. त्यांनी पुणेकरांना आवाहन केले की, ‘तुम्ही आजारी रुग्णांच्या मदतीला या. पुण्याबाहेर जाऊन आपला जीव आणखी धोक्यात घालू नका’. त्यांचे हे आवाहन पुण्यात काही ठिकाणी ऐकले गेले, काहींमध्ये नाही. पुण्यात प्रशासक म्हणून आलेल्या वॉल्टर रँडच्या सोजिरांनी पुण्यात तेव्हा अतोनात धुमाकूळ घातला होता. घराघरांमध्ये जाऊन ते महिलांना बाहेर काढत आणि त्यांच्या जांघा आणि काखा तपासत. हा अत्याचार भयानक होता. टिळकांनी त्याविरुद्ध नुसता आवाजच उठवला असे नाही, तर समाज संघटित केला. दामोदरपंत चाफेकरांना त्यांनी भर सभेत ‘तुम्ही षंढ नाही ना, मग रँड जिवंत कसा?’ असा प्रश्न केला. त्याआधी दामोदरपंतांनी टिळकांच्या सभेतच ‘येथे बसलेले सगळे षंढ आहेत’, असे म्हटले होते. सांगायचा मुद्दा हा की, त्या रँडच्या जाचाला वैतागून पुणे शहर ओस पडू लागले. लोकमान्यांना जे स्वयंसेवक हवे होते ते पुण्याच्या पूर्व भागात राहणारे तेली, तांबोळी आणि मानला गेलेला मागास समाज यातूनच पुढे आले. तेव्हापासून टिळकांची ओळख तेल्यातांबोळ्यांचे नेते, अशी झाली. खुद्द सुधारककर्ते आगरकरांनी त्या आधीच्या टिळकांच्या एका सभेवर टीका करताना ‘त्यांच्या सभेला तेली आणि तांबोळी जमतात आणि तेच त्यांना भूषणावह वाटत असते’, असे सुधारकात लिहिले होते. हाच तो काळ जेव्हा त्यांची ओळख लोकमान्य म्हणून झाली. प्लेगमध्ये बळी पडलेल्यांसाठी त्यांनी स्मशान फंड कमिटी काढली होती आणि ती शव नेण्याची आणि त्याचे दहन करण्याची व्यवस्थाही करीत असे. हे झाले मंडाले पूर्व काळातले म्हणजेच १९०८ पूर्वीचे टिळक. आता मंडालेनंतरचे टिळक पाहू. टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटून आल्यावर त्यांना एकच ओढ होती, ती म्हणजे काँग्रेस-प्रवेशाची. १९०७ मध्ये सुरतेच्या काँग्रेसनंतर त्यांना काँग्रेसबाहेर जावे लागले होते. १९०८ मध्ये त्यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. आधी साबरमतीच्या तुरुंगात ठेवल्यावर त्यांना तेव्हाच्या ब्रह्मदेशात (आता म्यानमार) मंडालेस पाठविण्यात आले. मंडालेहून ते १९१४ मध्ये परतले. त्यांच्या काँग्रेस प्रवेशास नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा विरोध होता. तोही ते काँग्रेसमध्ये शिरतील आणि काँग्रेस पक्षावर ताबा मिळवतील या ‘भीती’पोटी. त्यांची वकिली करायला महात्मा गांधीजीही पुण्यात येऊन टिळकांना भेटून गेले. टिळकांनी त्यांना जे सांगायचे ते सांगितलेच आणि गांधीजींनीही ‘काँग्रेस ही काही कोणा एकट्या- दुकट्याची नाही’, असे सांगून माघारी जाणे पसंत केले. दरम्यान १९ फेब्रुवारी १९१५ रोजी गोखले यांचे निधन झाले. त्यानंतरच्या मद्रास काँग्रेसमध्ये त्यांना फेरप्रवेश करता आला नाही, पण त्यापुढल्या लखनऊ काँग्रेसमध्ये त्यांनी आक्रमकरीत्या हिंदू-मुस्लीम ऐक्याची गर्जना केली. ज्याची ओळख लखनऊ करार अशी आहे.
तो करार घडवून आणण्यासाठी टिळक आणि महम्मद अली जीना यांनी अथक प्रयत्न केले. २९ डिसेंबर १९१६ रोजी लखनऊ काँग्रेसमध्ये टिळकांचे भाषण झाले. तेव्हा त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. ते बोलायला उभे राहिले आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ते म्हणाले, ‘ब्रिटिश राज्यकर्ते आम्हाला आर्य असण्यावरून म्हणतात की, तुम्ही या देशाचे नागरिक नाहीत. मी त्यांना विचारतो की, तुम्ही तरी या देशाचे मालक कुठे आहात? आधी मुघल इथे होते, त्यानंतर तुम्ही आलात. तुम्हीही या देशाला गुलाम बनवण्यासाठी आलात, आमच्यावर राज्य करून तुम्ही या देशाची लूट केलीत. ज्यांचा कोणाचा हा देश आहे असे मानता त्या आदी द्रवीड, गोंड, भिल्ल आणि पददलित यांच्या राज्य कारभार द्या आणि ताबडतोब सत्ता सोडा.’ टिळक थोडे थांबले आणि उसळून म्हणाले, ‘तुम्ही या देशातून तातडीने चालते व्हा.’ या वाक्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला, तो थांबेचना तेव्हा एक क्षण असा आला की या कडकडाटाने मंडप कोसळतो की, काय अशी स्थिती निर्माण झाली. टाळ्या जरा कमी होताच त्यांनी ती सिंहगर्जना केली, ‘होमरूल इज माय बर्थराइट अँड आय शॅल हॅव इट-स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवीनच’. जो जन्मसिद्ध अधिकार आहे तो माझाच आहे, पण मला मिळवायचे आहे ते स्वराज्य. त्यामुळे मी नेहमी असे सांगतो की मराठीत या घोषणेला इंग्रजी धाटणीनुसार स्वरूप द्यायला हवे. इथे ते म्हणजे स्वराज्य आहे आणि त्यांना ते मिळवायचे होते. सांगायचा मुद्दा हा की, टिळकांनी ही घोषणा करताच टिळकांच्या नावाचा एकच गजर झाला आणि टाळ्या, टाळ्या आणि टाळ्या निनादत राहिल्या. मंडालेनंतरचे टिळक हे असे आणखी तेज:पुंज आणि लखलखीत होते. आणखी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. त्यांच्या शेवटच्या दौऱ्यात त्यांचा मोठा सत्कार दलित समाजातर्फे मद्रासमध्ये झाला. तारीख आहे १७ डिसेंबर १९१९. त्यानंतर टिळकांनी आणखी एक मोठा दौरा केला तो सिंधचा. कराची, मिरपूर खास, हैदराबाद, शिकारपूर आदी ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या. २९ मार्च १९२० रोजी ते कराचीत सभांमागून सभा घेत फिरले. मदरसा, दर्गे, मशिदी आणि मोकळी मैदाने येथे त्यांच्या सभा झाल्या. ३० मार्चला ते हैदराबाद (सिंध) मध्ये पोहोचले. त्यांची एक जंगी सभा ज्या ठिकाणी झाली तिला आजही ‘टिळक इन्क्लाईन’ म्हणून ओळखले जाते. तशा पाट्या त्या भागात आहेत आणि त्यांचे छायाचित्रही माझ्याजवळ आहे. त्यांच्यासमवेत शेठ हाजी अब्दुल्ला, चोईतराम गिडवाणी, लाला लजपतराय आणि होमरूलचे तेव्हाचे अध्यक्ष दुर्गादास (तेव्हा वय २०. ‘इंडिया फ्रॉम कर्झन टू नेहरू अँड आफ्टर’चे लेखक.) हे होते. हैदराबादमध्ये ‘हिंदू’ नावाचे इंग्रजी वृत्तपत्र निघायचे होते. त्यासाठी एक घोषणा संपादकांना हवी होती. त्यांना टिळकांनी ‘होमरूल इज अवर बर्थराइट अँड वुई शॅल हॅव इट’ असे सुचवले होते. या संपूर्ण दौऱ्यात त्यांच्या जेवणाखाण्याचे हाल झाले. सिंध हैदराबादहून परतलेले टिळक सोलापूरच्या प्रांतिक काँग्रेससाठी रवाना झाले. टिळक म्हणजे झंझावात, टिळक म्हणजे लढा, टिळक म्हणजे संघर्ष आणि त्या संघर्षातच त्यांनी आजारपणालाही जवळ केले. त्यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करताना विशेष अभिमान वाटतो तो आपण त्यांच्या महाराष्ट्रात जन्मलो याचा.
(अरविंद व्यं. गोखले हे मंडालेचा राजबंदी आणि टिळकपर्व (१९१४-१९२०) या पुस्तकांचे लेखक आहेत)