Thursday, January 16, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यशिंदे गटामुळे तिरंगी लढत

शिंदे गटामुळे तिरंगी लढत

सीमा दाते

मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सगळेच पक्ष आतुर असतात आणि त्यासाठी हवी तशी निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू असते. आतापर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक ही शिवसेना आणि भाजपची होती. मात्र आता शिंदे गटामुळे महापालिकेची निवडणूक तिरंगी झाली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

गेले तीस वर्षं मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे आता ही शिवसेना आपली सत्ता गमावणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर आपले वर्चस्व कसे राहील याकडे शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहे, तर गेल्या निवडणुकीत म्हणजे २०१७ मध्ये अवघ्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या फरकामुळे भाजपला महापालिकेच्या सत्तेपासून मुकावे लागले आणि पाच वर्षे भाजप पहारेकऱ्यांच्या भूमिकेत बसली. मात्र आता आलेल्या संधीचं भाजपला सोनं करायचं आहे आणि त्यामुळे ही निवडणूक जिंकून आपला विजयाचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकवण्यासाठी भाजप उत्सुक आहे. त्यामुळे ही निवडणूक शिवसेना आणि भाजपची होती. मात्र आता शिंदे गटामुळे मुंबईतील निवडणूक तिहेरी होण्याची शक्यता आहे.

आधीच मुंबईतील पाच आमदार शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर नगरसेवक देखील शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत. नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात एन्ट्री घेतली आहेच, तर स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले यशवंत जाधव यांच्या पत्नी शिंदे गटात गेल्यामुळे यशवंत जाधवही शिंदे गटातच असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे मुंबईतील अनेक नगरसेवकांचा गट शिंदे गटात सामील होणार असून आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही शिवसेना-भाजप-शिंदे गट अशी होणार आहे. मात्र शिंदे गट आणि भाजप एकत्र असल्यामुळे भाजप आणि शिंदे गट विरुद्ध शिवसेना असे समीकरण या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये असणार आहे.

दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, समाजवादी पार्टी, एमआयएम आणि आता आम आदमी पार्टीदेखील तयारीत आहे, हे सगळे पक्ष निवडणूक लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी तयारीत आहेत. त्यातल्या त्यात आम आदमी पार्टीने तर पश्चिम उपनगरात तयारी देखील सुरू केली आहे. शिवसेनेकडून देखील शिवसंपर्क अभियानातून पक्षबांधणी सुरू केली. गेली ३० वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना जीव पणाला लावून काम करत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत नवीन नवीन प्रकल्पाचे उद्घाटन महापालिकेने केले आहे.

यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आलेली अनेक प्रकल्प आहेत, ज्याचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. एकीकडे शिवसेना पक्ष बांधणी करते, तर दुसरीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा. निवडणूक जिंकण्यासाठी आणि भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेना तयारीत आहे, तर दुसरीकडे भाजपही आपल्या बुथ संघटनेच्या माध्यमातून घराघरात पोहोचला आहे. गेले अनेक महिने भाजपचे नेते, गटनेते, नगरसेवक मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार समोर आणला आहे. राणी बागेपासून ते रस्त्यांच्या कामातील अनियमितता, कोविड सेंटरचे घोटाळे सगळ्याच भाजपकडून चौकशी करण्याची मागणी केली गेली होती. त्यामुळे मतदारांपुढे ही भाजपने शिवसेनेतील पाच वर्षांतील कामे कशी चालतात हे समोर आणले होते.

त्यामुळे या निवडणुकीत कौल भाजपच्या बाजूने लागतो की काय अशी चर्चा सुरू आहे. त्यातच ओबीसी आरक्षणामुळे शिवसेनेतील देखील अनेकांना आपला वॉर्ड सोडून दुसरा वॉर्ड शोधावा लागणार आहे. मात्र आता शिवसेनेचे दोन गट तयार झाल्यामुळे कुठला नगरसेवक आपला वॉर्ड सोडेल आणि दुसऱ्याला देईल याची शक्यता कमीच आहे. तर दुसरीकडे मनसे देखील आता अॅक्शन मोडमध्ये आहे. येणारी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेने पक्षबांधणी केली असून या निवडणुकीत मनसेही पूर्ण ताकदीने उतरणार आहे.

२०१७च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे केवळ ७ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मनसेत केवळ एकच नगरसेवक राहिले. मात्र आता मनसेचे नगरसेवक असलेला वॉर्ड सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्यामुळे नगरसेवकांच्या पत्नीला तिथून जागा मिळण्याची शक्यता आहे, तर लालबाग, परळ हा विभाग जसा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो तसा मनसेचाही जोर तेवढाच आहे. त्यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या भागात शिवसेनेला अटीतटीची लढत देण्यासाठी मनसे देखील मैदानात असणार आहे. एकूणच काय तर ही निवडणूक सगळ्यांना जिंकायची असली तरी शिवसेनेच्या विरोधातच ही निवडणूक आहे की काय अशी परिस्थिती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -