मुंबई (प्रतिनिधी) : अंधेरी जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडीपासून लवकरच मुंबईकरांची सुटका होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अंधेरी सर्कल ते पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा उड्डाणपूल सुरू होणार असल्यामुळे पश्चिमेकडील वाहतूक कोंडी सुटणार आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
दरम्यान पश्चिम उपनगरातील अंधेरी जंक्शन भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. सकाळी आणि संध्याकाळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो. यातून मार्ग काढण्यासाठी ना. सी. फडके मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय ५ वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. तेलीगल्ली जंक्शन ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारा हा उड्डाणपूल आहे. २०१८ मध्ये उड्डाणपूलाच्या कामाकरिता परवानगी मिळाली होती. ऑक्टोबर २०१९ पासून उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. तीन वर्षांनंतर आता या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
या उड्डाणपुलाची लांबी १२५ मीटर इतकी आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी १२५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आतापर्यंत उड्डाणपुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उर्वरित काम पूर्ण होणार असून त्यानंतर हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होणार आहे. हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर अंधेरी भागातील वाहतूक कोंडीची मोठी समस्या संपणार आहे. उड्डाणपुलामुळे या मार्गावरील वाहनांना पश्चिम द्रुतगती मार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे पुलाखालील रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे.