पाटणा : देशातून प्रादेशिक पक्ष संपणार असून महाराष्ट्रातून शिवसेनाही संपत चालली असल्याचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे.
संजय राऊतांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय घडमोडी ढवळून निघालेल्या असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपशी मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही, असे म्हटले आहे. तसेच काँग्रेस आता देशातून संपत असल्याचे सांगत नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांवरही हल्लाबोल केला. भाजपचा लढाई वंशवाद आणि परिवारवादाशी आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा घराणेशाहीतला पक्ष आहे. तर, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाशी दोन हात करत आहोत. ओडिशामध्ये नवीन पटनाईक यांचा पक्ष हा एका व्यक्तीचा पक्ष आहे. महाराष्ट्रातही शिवसेना आता संपत असून पक्षात घराणेशाही आहे. काँग्रेसदेखील आता बहिण-भावांचा पक्ष झाला असल्याची टीका नड्डा यांनी केली. देशात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा त्यांनी केला आहे. कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही जो भाजपला पराभूत करू शकेल असेही नड्डा यांनी म्हटले आहे. बिहार येथील १६ जिल्ह्यातील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पाटणा येथे बोलत होते.
आता देशातील १८ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. ईशान्य भारतात भाजपचे कार्यकर्ते होते. मात्र, आता तिथेही भाजपची सत्ता आहे. दक्षिणेत तेलंगणात भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वासही नड्डा यांनी व्यक्त केला. भाजपकडे एक विचारसरणी आहे. त्याआधारे कार्यकर्ते जोडले जात आहेत. विचारसरणी नसलेले पक्ष संपले आहेत अथवा संपत आहेत असेही त्यांनी म्हटले.
भाजप कार्यालय हे कार्यकर्त्यांचे पॉवर हाऊस आहे. इथून करोडो कार्यकर्ते जन्माला येतील. भाजप हा विकासाचा समानार्थी शब्द आहे. भाजपच्या वाढत्या स्वीकारार्हतेचा दावा करून ते म्हणाले की, आता देशात एक राष्ट्र एक कायदा आहे. भाजप आपल्या कार्यकर्त्यांना मूल्य शिकवते असेही ते म्हणाले. आम्ही वैचारिक पार्श्वभूमी घेऊन उभे आहोत, असे ते म्हणाले. जर आम्हाला कल्पना नसती तर आम्ही एवढा मोठा लढा लढला नसता. आज दोन-तीन दशके इतर पक्षात राहिलेले अनेक लोक पक्ष सोडून भाजपमध्ये येत आहेत. काम करताना देश बदलण्याची ताकद असेल तर ती भाजपमध्येच आहे, हे या सर्वांना समजले आहे.