Thursday, March 20, 2025
Homeमहत्वाची बातमीसंजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

मुंबई : मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची ईडीने न्यायालयाकडे ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र ८ दिवस ईडी कोठडीसाठी नकार देत संजय राऊतांना न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी मंजूर केली.

ईडीच्या कोठडीतही संजय राऊतांना घरचे जेवण, औषधे मिळणार आहेत. तसेच सकाळी साडेआठ ते साडेनऊ या काळात राऊतांचे वकील त्यांना भेटू शकतात आणि रात्री साडे दहानंतर संजय राऊतांची चौकशी करता येणार नाही, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

संजय राऊतांना अटक केल्यानंतर आज संजय राऊतांना सत्र न्यायालयात कोर्ट रूम नंबर १६ मध्ये न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर ईडीने रिमांडसाठी संजय राऊतांना हजर केले. जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊतांच्या बाजूने युक्तिवाद केला. तर ईडीच्यावतीने हितेन वेणेगावकर यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला.

संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांना दरमहा २ लाख रुपये दिले जायचे असा आरोप ईडीने केला आहे. तसेच संजय राऊत यांच्या परदेश दौऱ्यासाठीही प्रविण राऊत यांनी पैसा दिला होता, असाही दावा ईडीने केला. २०१०-११च्या दरम्यान संजय राऊतांच्या अनेक परदेश दौऱ्यांना फायनान्स करण्यात आले होते, असा आरोपही ईडीने केला.

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सुनिल राऊत हे एक व्यावसायिक आहेत, असा युक्तिवाद संजय राऊतांच्या वकिलांमार्फत करण्यात आला. कोठडी द्यायची असेल, तर कमी दिवसांची द्या, अशी मागणीही राऊतांच्या वकिलांकडून करण्यात आली. संजय राऊतांच्या अनेक कंपन्या आहेत. सर्व पैसे कायदेशीररित्या आले आहेत, असा दावाही यावेळी करण्यात आला.

दरम्यान, संजय राऊतांच्या अटकेनंतर त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांनी पत्रा चाळ आणि संजय राऊतांचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगितले. अटक करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून पत्रा चाळ प्रकरण पुढे केले आहे. हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांना अटक करण्यासाठी फ्रेम तयार केली. त्यात बोगस कागदपत्रे लावले आहेत. ईडी त्यांचे काम करेल आम्ही आमचे काम करु, असे सुनील राऊत म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -