Monday, February 17, 2025
Homeमहत्वाची बातमीऑगस्टमध्ये राज्यात ऊन-पावसाचा लपंडाव

ऑगस्टमध्ये राज्यात ऊन-पावसाचा लपंडाव

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह राज्यात ऊन-पावसाचा लपंडाव सुरू झाला आहे. तापमान वाढीमुळे राज्यातील काही भागात कमी कालावधीत जास्त पाऊस पडेल. मात्र, पावसाचे प्रमाण जुलैपेक्षा कमी असेल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

तापमान वाढीमुळे संपूर्ण ऑगस्ट महिना राज्यात ऊन-पावसाचा लपंडाव चालणार आहे. खरंतर यावर्षी राज्यात पाऊस लवकर येणार असा अंदाज असतानाही पावसाचे आगमन काहीसे उशिराच झालेले दिसून आले. यामुळे पाण्याची कमतरता काही भागांमध्ये विशेष जाणवली. जून महिना कोरडा गेल्याने राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. परिणामी, पाण्याची टंचाई भासू लागली होती.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही वाढला. परंतु, सध्या वाऱ्यांच्या दिशेत बदल झाला आहे आणि जमिनीवर हवेचा दाब वाढल्याने समुद्राकडून जमिनीकडे येणाऱ्या वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, ऑगस्ट महिन्यात काही भागात किरकोळ पाऊस पडेल, पण त्यानंतर तेथे उघडीप होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा एक ते दोन टक्केच अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडण्यास अनुकूल हवामान नसल्याने पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वाऱ्यांची दिशा बदलून वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतील. त्यामुळे राज्यातील कोरड्या भागात पाऊस पडेल. धुळे, लातूर, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद या पाच जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस पडेल. या भागात कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्यात आणि घाट भागात पावसाचे प्रमाण कमी होत जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -