Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीवादग्रस्त वक्तव्यावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची माफी

वादग्रस्त वक्तव्यावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची माफी

मुंबई (प्रतिनिधी) : अंधेरी येथे २९ जुलै रोजी झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली, अशी दिलगिरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्ज्वल परंपरा आहे आणि यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे, असे कोश्यारी यांनी सांगितले.

गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला; परंतु त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही, अशी खंतही राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -