Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखविकासासाठी शुभेच्छा!

विकासासाठी शुभेच्छा!

महाराष्ट्र राज्य हे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत सुजलाम सुफलाम राज्य म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यांतून अनेक जण महाराष्ट्रात उपजीविकेसाठी येत असतात. एकेकाळी केवळ मुंबई शहर व सभोवतालच्या उपनगरातच उपजीविकेची साधने उपलब्ध होती; परंतु आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत उपजीविकेची माध्यमे उपलब्ध होऊ लागली आहेत. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, त्यावेळी महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. कालांतराने प्रशासकीय कारभारासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाने त्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यांची संख्या वाढत गेल्याने आता महाराष्ट्रात ३६ जिल्हे निर्माण झाले आहेत. पालघर जिल्हा हा कोकण विभागात महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ रोजी पालघरची निर्मिती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा म्हणून निर्माण झालेल्या जिल्ह्याचे मुख्यालय पालघर शहरच आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता अत्यंत घिसाडघाईने आघाडी सरकारने नवीन जिल्हा निर्माण करण्याचा निर्णय घेतला. पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्हावासीयांच्या नाराजीचा फटका बसेल, अशा भीतीमधून हा निर्णय झाला. १ ऑगस्ट २०१४ पर्यंत आता पालघर जिल्ह्याचा समावेश असलेल्या तालुक्यांनी ठाणे जिल्ह्याचा एक भाग बनविला आहे. विभाजनासाठी जवळपास २५ वर्षे संघर्ष व मागणीनंतर १३ जून २०१४ रोजी नवीन जिल्हा निर्मितीस महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि १ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्हा अस्तित्वात आला. या जिल्ह्याला आठ वर्षे पूर्ण झाली असली तरी जिल्ह्याने अद्याप बाळसे धरलेले नाही. अतिग्रामीण भागातील आदिवासींची परिस्थिती आजही ‘जैसे थे’ आहे. पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा आहे. कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पूर्वेकडे असणाऱ्या सह्याद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे. पालघर जिल्हा उत्तरेकडील डहाणूपासून सुरू होऊन नायगाव येथे संपतो. पालघर जिल्ह्याची लोकसंख्या आजमितीला ३० लाखांहून अधिक आहे. पालघर जिल्ह्यात ८ तालुके आहेत. त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़. पालघर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण असे दोन्ही चेहरे पाहावयास मिळतात. पालघरची शहरी लोकसंख्या पंधरा लाखांहून अधिक आहे. एकूण लोकसंख्येच्या ५० टक्क्यांहून अधिक शहरी भागात राहतात. पूर्व व ईशान्य दिशेस ठाणे व नाशिक जिल्हा असून, गुजरात राज्यातील वलसाड जिल्हा व दादरा व नगर हवेली व उत्तरेकडील दमण व दीव केंद्र शासित प्रदेश हे जिल्हा वसलेले आहे. अरबी समुद्राची पश्चिम सीमा बनते, तर वसई-विरार, पालघर-बोईसर, डहाणू हे मुंबई महानगर प्रदेशाचे भाग आहेत. अरबी समुद्राच्या पश्चिम तिरावर हा जिल्हा वसलेला असून या जिल्ह्याच्या भोवती सह्याद्रीच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. आपल्या देशात सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला पालघर हा एकमेव जिल्हा आहे.

राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा हा त्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे ओळखला जातो. पालघर जिल्हा नुकताच आठ वर्षांपूर्वी निर्माण झाला असला तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विकासाच्या बाबतीत गरुडभरारी मारण्याची ताकद या जिल्ह्यात आहे. जिल्ह्याच्या पूर्वेला सह्याद्रीच्या रांगा आणि पश्चिमेला अथांग असा समुद्र तद्वतच जंगल, डोंगर कपारींनी हा जिल्हा समृद्ध आहे. डहाणू येथील चिक्कू आणि वसईची केळी महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहेत. पालघर जिल्ह्यात धोडिया, कोळी महादेव, दुबळा, कोळी मल्हार, कोकणा, कातकरी आणि वारली या आदिवासी जमाती प्रामुख्याने वास्तव्याला आहेत. जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कोकाकोला, ओनिडा सारखे कारखाने आहेत. शहराला लागूनच फार मोठी औद्योगिक वसाहत असून येथे अवजड यंत्राचे, औषधांचे, रसायनांचे, कपड्यांचे कारखाने आहेत. डहाणू हा तालुका वारली आदिवासींच्या संस्कृतीमुळे आणि त्यांच्या चित्रकलेमुळे प्रसिद्ध आहे. तारपा नृत्य आणि वारली चित्रकला ही आदिवासींच्या समाजजीवनाची ओळख या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. मोखाडा तालुक्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

पालघर जिल्ह्यात मुख्यतः भात आणि नागलीचे पीक घेतले जाते. या ठिकाणी हळद लागवडीचा प्रयोगही यशस्वी झाला आहे. समुद्राजवळच हा जिल्हा येत असल्याने येथे मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. कोळंबी आणि पापलेट या माशांची येथून जास्त प्रमाणात निर्यात केली जाते. रेल्वे स्थानकाच्या सोयीमुळे गुजरात राज्यातील व्यापारी पालघरशी जोडले गेले आणि बरेचसे येथेच स्थायिक झाले. पालघर जिल्हा हा महाराष्ट्राच्या कोकण सखल प्रदेशाचा उत्तर भाग आहे. यात दक्षिणेस उल्हास खोरे व उत्तरेकडील डोंगराळ वैतरणा खोरे तसेच पठार व सह्याद्रीच्या उतारासह विस्तृत अॅम्फीथिएटरचा समावेश आहे. पूर्वेकडील सह्याद्रीच्या उंच उतारापासून उत्तरेकडे आणि जिल्ह्याच्या मध्यभागी पठाराच्या उत्तरेकडून दक्षिणेकडील उल्हास दरीपर्यंत जमीन खाली येते. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर डोंगरात गोदावरीच्या उगमस्थानासमोर कोकण नद्यांचा सर्वात मोठे वैतरणा प्रकट होते. ही नदी शहापूर, वाडा आणि पालघर तालुक्यातून वाहते आणि अर्नाळाच्या एका विस्तृत मोहिमेद्वारे अरबी समुद्रात प्रवेश करते. अरबी समुद्राला वाहणारी उल्हास नदी म्हणजे वसई खाडी, जिल्ह्याची दक्षिणेकडील सीमा. अर्नाळा बेट वसई तालुक्यात वैतरणा वस्तीच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. कोणत्याही प्रदेशाचा विकास करायचा असेल तर तेथील लोकांना त्याग व संघर्ष करत त्याला परिश्रमाची सांगड ही घालावीच लागते. प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता त्यांना स्वत:लाही त्यामध्ये योगदान द्यावेच लागेल. पालघर जिल्ह्याला आठ वर्षे झाली असली तरी आगामी काळात पालघरचा चेहरा नक्कीच बदललेला पहावयास मिळेल. नैसर्गिक साधनसामुग्री मुबलक आहे. शेतीपुरक व्यवसायास पोषक वातावरण आहे. विशेष म्हणजे मुंबई-ठाण्यासारख्या विकसित भागाचा शेजार आहे. त्यामुळे वर्धापनदिनाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याच्या वाटचालीला व पालघरवासियांच्या विकासाला शुभेच्छा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -