Wednesday, April 30, 2025

रायगड

पावसाने दांडी मारल्याने भातशेती सुकण्याची भीती

पावसाने दांडी मारल्याने भातशेती सुकण्याची भीती

तळा (वार्ताहर) : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने भातशेती सुकून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरुवातीपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने शेतकऱ्यांनी आपली लावणी आटोपून घेतली होती. लावणीनंतर रोपे वाढण्यासाठी पावसाची आवश्यकता असते. मात्र गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दांडी मारल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.

लावणीनंतर थोड्या थोड्या प्रमाणात जरी पाऊस सुरू असला तरी रोपांना जगण्यासाठी आधार मिळतो. खोलगट भागात भातशेतीत पाण्याचा ओलावा टिकून रहात असल्यामुळे पाण्याची तेवढी आवश्यकता भासत नाही; परंतु तालुक्यातील बरेचसे शेतकरी व आदिवासी बांधव डोंगर उतारावर शेती करीत असल्याने त्या ठिकाणी पावसाची नितांत आवश्यकता असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडत असल्याने ही भातशेती सुकून करपण्याच्या मार्गावर आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे तळा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. अशातच आता पावसाने दांडी मारल्याने ज्या शेतकऱ्यांनी शेती केली आहे, त्या शेतकऱ्यांना आता आपल्या भाताची रोपे करपतात की काय?, अशी चिंता सतावू लागली आहे.

Comments
Add Comment