कोलकाता : पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये मेखलीगंज येथील धारला पुलावर धक्कादायक घटना घडली आहे. पिकअपव्हॅनला विद्द्युत प्रवाह लागून १० जणांचा मृत्यू झाला असून १६ जण गंभीररित्या भाजले आहेत. घटनेत जखमी झालेल्या कावड यात्रेकरुंना चंगरबांधा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या पिकअॅप व्हॅनमध्ये २७ कावडयात्रेकरु होते. हे सर्व यात्रेकरुन भगवान शंकराला जलाभिषेक करण्यासाठी निघाले होते. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पिकअप व्हॅनच्या मागे डीजे ठेवला होता. जनरेटच्या वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पिकअपमध्ये करंट लागला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
विद्युत प्रवाह पिकअप व्हॅनमध्ये पोहोचताच पहिला झटका चालकाला लागला. मात्र, चालकाने तत्परता दाखवत गाडीतून उडी मारली व पळून गेला. मात्र, ही घटना इतकी जलद घडली की पिकअपमधील कावड यात्रेकरुनंना काही कळण्याआतच त्यांना विजेचा शॉक लागला आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. एक- एक करुन पिकअपमधून ते खाली कोसळले. तर, काही कावडयात्री जखमी असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
माताभंगा एसपी अमित वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री १२च्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेत जखमी झालेल्या कावड यात्रेकरुंना चंगरबांधा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी हे जालपाईगुडी परिसरातील आहेत. तर, चालकाचा शोध पोलिस घेत असून पिकअप वाहन पोलिसांनी जप्त केलं आहे.