मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर त्यांना रात्री साडेबाराच्या सुमारास पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात अटक केली. यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. याप्रकरणात आता भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेतील आहे. त्यांनी एक ट्वीट करत खासदार राऊतांना टोला लगावला आहे.
निलेश राणे ट्वीट करत म्हणाले की, दुसऱ्यांच्या घरात पण आई असते, मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत विसरता कामा नये. हेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला पण लागू होते, कारण पुढचा नंबर त्यांचा असू शकतो, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
दरम्यान, तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. यावेळी राऊत कुटुंबीय अत्यंत भावूक झाले होते. संजय राऊत यांच्या मातोश्रींनी त्यांचे औक्षण केले. राऊतांनीही आईच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. राऊतांनी त्यांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या पत्नी वर्षा राऊतही तिथे उपस्थित होत्या. राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यावर संजय राऊत यांच्या आईचे अश्रू अनावर झाले होते.