सफाळे (वार्ताहर) : पावसाळा सुरू झाला की आजूबाजूच्या छोट्या गावांमध्ये, डोगंरदरी, कपाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या रानभाज्या उगवू लागतात. या रानभाज्या खूप औषधी असतात. पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या एकदाच उगवत असल्याने कमीत कमी वर्षातून तरी संधी साधून एकदा तरी खाव्यात. खरंतर पालेभाज्या म्हटल्या की बरेच जण नाक मुरडतात परंतु या रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण परिसरात फिरत असताना या बऱ्याचश्या भाज्या आपल्याला दिसत असतात पण आपल्याला यांची नावे माहिती नसतात किंवा प्रत्यक्ष त्याचा अन्नात उपयोग होतो हेही माहिती नसते.
बऱ्याच वेळा या भाज्या पाहिल्या पण ही भाजी कोणती आहे ? आणि ही भाजी आहे का ? हे मुळात कोणाला माहिती नव्हते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाहण्यात व खाण्यात आलेली भाजी विद्यार्थी लगेच त्याचे नाव ओळखतात की, ही भाजी कड्डू आहे किंवा ही भाजी खापरा आहे. अशा विविध भाज्यांची नावे मुले नियमित सांगत असतात. त्यांच्या डब्यामध्ये सुद्धा ह्या भाज्या असतात. ह्या भाज्यांची ओळख अन्य काही मुलांना नसल्याने ती सगळ्या मुलांना व्हावी, त्या भाज्यांचे महत्त्व कळावे ही भाजी कशी बनवतात याविषयी माहिती मिळावी म्हणूनच पालघर तालुक्यातील सफाळे पूर्वेकडील नवघर शाळेमध्ये रानभाज्या महोत्सव भरवण्यात आला होता.
प्रथम परिसरामध्ये होणाऱ्या विविध भाज्यांची विद्यार्थ्यांकडून नावे माहिती करून घेऊन त्यांची एक यादी बनविण्यात आली. सोबतच विशेषतः पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असणाऱ्या काही हिरव्या भाज्यांची नावे मुलांनी सांगितली आणि त्यामुळे त्याही भाज्या या महोत्सवामध्ये शाळेने सामील करून घेतल्या. या रानभाज्या म्हणजे कडडू, लोथी, दिंडे, कंटोली, खापरा, शेवग्याचा पाला, वास्ता, भाजे, टेरी, टाकळा अशा विविध भाज्या महोत्सवात सहभागी करण्यात आल्या. त्यासोबतच अळू, लाल, माठ, मेथी, कारली, भेंडे, कोथिंबीर, चवळी, भाजी, पालक, करडू अशा आणखी विविध भाज्या यात सहभागी करून घेतल्या होत्या.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने या भाज्यांची नावे सांगितली. मुलांनी त्या भाज्या कशा बनवतात याविषयीही माहिती सांगितली. पालकही या मेळाव्याला उपस्थित होते. पालकांनीही या मेळाव्याचा मनमुराद आनंद घेतला. यातली एक दोन भाजी तर काही पालकांनी पाहिलीही नव्हती. यातील काही भाज्या पालकांनी मुलांकडून खरेदी केल्या आणि मुलांना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला.