Friday, October 11, 2024
Homeमनोरंजनआनेवाला पल जानेवाला हैं...

आनेवाला पल जानेवाला हैं…

श्रीनिवास बेलसरे

नेहमी हुकमी हलकाफुलका आनंदी सिनेमा देणारे दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘गोलमाल’ आला १९७९ साली. त्यात त्यांनी त्यांच्या नेहमीच्या यशस्वी टीमलाच प्रमुख भूमिकांसाठी निवडले होते. उत्पल दत्त, ओम प्रकाश, देवेन वर्मा, शुभा खोटे, दिना पाठक, डेव्हिड या कसलेल्या कलाकारांबरोबर नायक-नायिकेच्या भूमिकेत होते निरागस चेहऱ्याचे अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी! मात्र ‘गोलमाल’मधील सहयोगी कलाकारांचा लखलखता बावनकशी अभिनय पाहिला की वाटते, या सिनेमाचे नायक, नायिका होते उत्पल दत्त आणि दिना पाठकच! दोघांनी अभिनयाचा कहर केला आहे. सिनेमाचे सगळे चित्रीकरण अवघ्या ४० दिवसांत पूर्ण झाले होते.

‘गोलमाल’ ही खरे तर नोकरीची खूप गरज असलेल्या एका मध्यमवर्गीय तरुणाने मारलेल्या थापेची कथा! आणि या एका थापेतून उद्भवलेल्या गोंधळाची ऋषिदांनी प्रचंड रंगवलेली कहाणी म्हणजे हा सिनेमा!

संपूर्ण कथा अतिशय प्रसन्न, हलकीफुलकी, निर्मल आनंद देणारी असल्याने सिनेमा खूपच लोकप्रिय झाला. ‘आनेवाला पल जानेवाला हैं’ या रचनेसाठी गुलजार यांना सर्वोत्तम गीतकार पुरस्कार मिळाला, तर अमोल पालेकर यांना सर्वोत्तम नायकाचा आणि उत्पल दत्त यांना सर्वोत्तम विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय ऋषिकेश मुखर्जी, दीना पाठक, देवेन वर्मा शैलेश दुबे (कथा) यांच्याही नावांची वेगवेगळ्या पुरस्कारासाठी नामांकने झाली होती.

गोलमाल खूप गाजल्यामुळे लगेच १९८१ मध्ये त्याचा तमिळ रिमेक निघाला ‘थिल्लू-मुल्लू’ नावाने, तर १९९०मध्ये ‘असेगोब्बा-मेसेगोब्बा’ या नावाने तो कानडीत गेला. मल्याळी भाषेत त्याची आवृत्ती ‘सिम्हवलन मेनन’ या नावाने निघाली १९९५ला. इतकेच काय आपल्या ऋषींदांचा ‘गोलमाल’ चक्क श्रीलंकेतही गेला, तेथील दिग्दर्शक यसपलिथा नानायक्कारा यांनी सिंहला भाषेत ‘रसा रहसक’ या नावाने तो १९८८ला रिलीज केला! गोलमालच्याच कथेवरून २०१२चा ‘बोलबच्चन’ आला, ज्यावरून पुन्हा तेलुगूत २०१३ साली ‘मसाला’ निघाला होता!

सिनेमाला संगीत होते राहुलदेव बर्मन यांचे, गीतकार होते गुलजार, स्क्रीनप्ले होता सचिन भौमिकांचा, तर जबरदस्त संवाद होते राही मासूम रजा यांचे.राम प्रसाद शर्माला (अमोल पालेकर) आई, वडील किंवा कुणीही नातेवाईक नसतात, असते फक्त एक बहीण रत्ना (मंजू सिंग) आणि जवळचे असे डॉक्टर केदारमामा (डेव्हिड). केदारमामा त्याला ‘ऊर्मिला ट्रेडर्स’मध्ये एक जागा खाली असल्याची माहिती देतानाच मालकाच्या स्वभावाबद्दल टिप्स देतात आणि सिनेमा सुरू होतो. यात गुलजार यांचे एक पारितोषिकप्राप्त गीत होते. जे खरे तर कथेत चपखल बसत असले, तरी कथेच्या बाहेर जाऊन मोठा आशय देत होते –

आनेवाला पल जानेवाला हैं,
हो सके तो इसमें, ज़िन्दगी बिता दो,
पल जो ये जानेवाला हैं…

गुलजार जरी गीतकार म्हणून गाजले असले तरी ते खरे कवीच आहेत. जसे मराठीत ‘सौमित्र’ गीतकाराची भूमिका करतानाही कवीचे स्वातंत्र्य उपभोगतात तसेच गुलजारही, गाणे म्हणून प्रत्येक वेळी एक मनस्वी कविताच लिहीत असतात. तोच ताजा टवटवीत अनुभव, कवितेचे तेच नाजूक हळवे कल्पनाविश्व गुलजार अवघ्या एक-दोन कडव्यात उभे करतात. नायिका रत्नाला (बिंदिया) गाणे शिकवायला अमोल आलेला आहे. तिच्या एककल्ली आणि हट्टी वडिलांनी त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले आहे. त्यावेळी अमोल हे गाणे गातो –

एक बार यूँ खिली, मासूमसी कली,
खिलते हुए कहाँ खुशबाश मैं, चली.

अमोलने आपल्या या डबलरोलमध्ये आपल्या जुळ्या भावाची प्रतिमा एक मनमौजी, मनस्वी तरुण अशी ठेवायचे ठरवले असते. म्हणून गुलजार गाण्याच्या पहिल्याच कडव्यात लिहितात, एक नितळ निरागस कळी उमलली. आता खरे तर कळीचे आयुष्य एक दिवसाचे. उमलल्याच्या सायंकाळीच ती सुकून जाते. तरीही गुलजार म्हणतात, तिने जाता-जाता एक संदेश दिला. ‘मी तर अगदी ‘खुशाबाश’ म्हणजे आनंदात जगते आहे’ आणि ती गेली! माणसाने असेच जितके मिळाले तितके आयुष्य, जी मिळाली ती क्षणिक संधीसुद्धा आनंदाने स्वीकारावी. कारण आयुष्य मुळातच इतके क्षणभंगुर आहे की, आता आपल्या बोटांच्या चिमटीत एखाद्या फुलपाखरासारखा धरलेला क्षणसुद्धा लगेच निसटून जातो. आता इथे होता, तर दुसऱ्या क्षणाला अदृश्य झालेला असतो.

देखा तो यहीं है, ढुँढा तो नहीं हैं,
पल जो ये जानेवाला हैं…

आयुष्य म्हणजे नुसते जन्म आणि मृत्यूमधले अंतर नसते. काळ नेहमी अदृश्यच असतो. जेव्हा आपण गेलेल्या काळाचा विचार करतो, तेव्हा काळ असे काही नसतेच. असतात त्या काही आठवणी. आपणच नायक, नायिका, तर कधी खलनायक झालो त्या कहाण्या. कधी रडवणाऱ्या, कधी हसवणाऱ्या! त्यामुळे जिथे काळाचे कवडसे पडले होते, तिथे फक्त एखादी कथाच सापडली. ते क्षण कधीच सापडले नाहीत –

एक बार वक्तसे, लम्हां गिरा कहीं,
वहाँ दास्ताँ मिली, लम्हां कहीं नहीं.
थोड़ासा हँसाके, थोड़ासा रुलाके,
पल ये भी जानेवाला हैं…

गोलमाल रिलीज झाला २० एप्रिल १९७९ला. तेव्हापासून आलेला प्रत्येक क्षण जातोच आहे, तब्बल ४३ वर्षे आणि तीन महिने झाले! हा आताचाही क्षण क्षणार्धात जाणारच आहे! म्हणून तर –

“हो सके तो इसमें, ज़िन्दगी बिता दो,
पल जो ये जानेवाला हैं…

कसले हे गीतकार कसले त्यांचे चिंतन आणि कसली अलगद आपल्या मनावर ताबा मिळवणारी ही गाणी! आनंद हैं… आनंद हैं!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -