सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून खुनातील एका आरोपीने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वैरण अड्डा येथील भिंतीवरून उडी मारून पसार झाला. सुनील राठोड असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
यामुळे कारागृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुनील राठोड आणि त्याच्या पत्नीला तासगावमधील एका खून प्रकरणी अटक करण्यात आली होती. या आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अनवेशनचे एक पथक कर्नाटकाकडे रवाना झाले आहे.
तासगावमध्ये जेसीबी चालक म्हणून काम करणारा सुनील राठोड (रा. येळगोड, जि. विजापूर) यांने पत्नी पार्वती हिच्या मदतीने जेसीबी मालक हरी पाटील (रा. मंगसुळी, ता. अथणी) यांचा ८ जून २०२१ रोजी खून करून मृतदेह विहीरीत टाकला होता. पोलीसांनी दोघा पतीपत्नींना अटक केली होती. न्यायालयीन आदेशानुसार संशयित जिल्हा कारागृहात बंदी होता.