त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) : श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. श्रावणी सोमवार असल्याने भाविकांसाठी त्र्यंबकनगरी सज्ज झाली आहे. सलग दोन वर्षे कोरोना कोविडमुळे लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी होती. गर्दी होईल म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती. दोन वर्षानंतर आता तिसऱ्या वर्षी श्रावणात भक्तीत लीन होण्यासाठी भाविक पर्यटक आनंदात आहेत.
यानिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व त्र्यंबक नगरपरिषदेतर्फे वेगवेगळे नियोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने मंदिराच्या नियमांचे पालन करून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्त मंडळ व प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य यांनी केले आहे.
सर्व भाविकांना मोफत धर्मदर्शन वातानुकूलित मंडपातून पूर्व दरवाजाने जाऊन धर्मदर्शन मिळेल. या ठिकाणी भाविक थंडी, ऊन, पावसापासून सुरक्षित राहतील. वयस्कर भाविकांना बसण्यासाठी रांगेतील स्टीलच्या बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रावण महिन्यात सर्व सोमवार वगळता मंदिर पहाटे ५ वाजता उघडेल व रात्री ९ वाजता बंद होईल. तर प्रत्येक श्रावण सोमवारी फक्त महिन्यात पहाटे ४ वाजता उघडून रात्री ९ वा. बंद होईल. त्र्यंबक नगर परिषदेच्या वतीने साफसफाई व स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहे.
त्र्यंबकेश्वरसाठी सिटीलिंकच्या दहा जादा बस
श्रावण महिन्यानिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी दहा जादा बस सोडण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. श्रावणात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणीदेखील भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच श्रावण महिन्यात सोमवारला विशेष महत्त्व असल्यामुळे सोमवारी विशेष गर्दी असणार आहे. त्यामुळे भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सिटीलिंककडून पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या सोमवारी दररोजच्या २२ बसव्यतिरिक्त दहा जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी त्र्यंबकेश्वरसाठी असलेल्या नियमित बसबरोबरच या अतिरिक्त दहा बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त भाविकांनी या जादा बसचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.