Friday, October 11, 2024

कलम ३७६

अॅड. रिया करंजकर

समाजामध्ये तरुण मुला-मुलींना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे, ही तरुण मुले चुकीच्या मार्गाने जातात. या तरुणांमध्ये एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमापेक्षा आकर्षण जास्त असतं व आकर्षणामुळे अनेकजणांचं आयुष्य मात्र बरबाद होतं. एखादा मुलगा एखाद्या तरुणीला फसवत आहे, हे मात्र या तरुण मुलींना कधी लक्षात येत नाही. ज्यावेळी त्यांची फसवणूक होते त्यावेळी त्यांचे डोळे उघडतात, तोपर्यंत सर्व काही संपलेलं असतं.

नाझ ही २३ वर्षीय सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी. चार भाऊ, तीन बहिणी व आई असे तिचे कुटुंब. वडील आजारपणामुळे निधन झालेले. घरची सर्व जबाबदारी तिच्या तीन मोठ्या भावंडांवर होती. चारपैकी तीन भाऊ मोबाइल रिपेरिंगचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नाझ मुंबईत जरी राहत असली तरी मूळची ती उत्तर प्रदेशची होती. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ती आपल्या उत्तर प्रदेशातल्या गावाला गेली आणि शेजारच्या गावातल्या चांद या २७ वर्षीय युवकाशी तिची ओळख झाली. तोही सुट्टीनिमित्त गावी आला होता. त्याचा टेलरिंगचा व्यवसाय होता आणि तो गुजरातमध्ये अहमदाबाद येथे होता. दोघांची फेसबुकवरून मैत्री झाली.

दोघेही आपापल्या शहरात गेल्यानंतर त्यांचा फोनवरून एकमेकांशी संपर्क होत होता. त्यांची एक प्रकारे चांगली मैत्री जमली होती आणि एक दिवस चांदने आपण नाझवर प्रेम करतो, असं सांगितले. पण नाझ हिने या गोष्टीला नकार दिला. पण प्रत्येक वेळी चांद फोन करायचा. त्यावेळी माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं तिला सतत सांगायचा. हळूहळू नाझलाही या गोष्टीवर विश्वास बसला. तिनेही चांदला होकार कळवला. त्यांचेही प्रेम लग्न करायचं, या गोष्टीवर येऊन ठेपलं. तेव्हा चांद तिला बोलला की, मी मुंबईला येणार आहे. तेव्हा आपण भेटू. ठरल्याप्रमाणे चांद मुंबईला आला व तिला भेटला. नाझ चांदला मुंबई येथील अापल्या आत्याकडे घेऊन गेली व चांदची ओळख करून दिली. चांदनेही आपण नाझशी लग्न करणार आहोत, असं नाझच्या आत्याला सांगितलं.

पुढील बोलणी करण्यासाठी तो तिला लॉजवर घेऊन गेला आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता तिने ‘या गोष्टी आता नको लग्नानंतर’, असं त्याला धमकावून सांगितलं. त्याने ते मान्य केलं आणि ‘मी घरातल्या लोकांना सांगून लवकरात लवकर आपण लग्न करू’, असं आश्वासन देऊन तो पुन्हा अहमदाबादला निघून गेला. दररोज त्यांचे फोनवर वार्तालाप होत होते. काही कामानिमित्त चांद पुन्हा मुंबईला आला व परत नाझला घेऊन तो त्याच लॉजवर गेला. आपण लवकरात लवकर लग्न करू, असं तिला सांगून तिच्याशी जवळीक साधून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुन्हा अहमदाबादला निघून गेला. त्यांचे फोनवर बोलणे होत होते.

नाझ सतत लग्नाबद्दल आणि घरातल्या लोकांना सांगितलंस का?, असं विचारत होती. तो सांगत होता की, घरातली लोकं तयार होणार नाहीत, आपण कोर्ट मॅरेज करू या. कोर्ट मॅरेजची जी प्रोसेस आहे, ती मी पूर्ण करतो व तुला सांगतो. नाझ त्याच्या गोष्टींवर विश्वास ठेवत होती. लॉकडाऊनमध्ये कोर्ट मॅरेज होऊ शकत नाही, असं चांदने तिला सांगितलं. लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर त्याने तिला सांगितलं की, कोर्ट मॅरेजची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. ती समजावून देण्यासाठी मी मुंबईला येतो. ठरल्याप्रमाणे चांद मुंबईला आला व पुन्हा नाझला त्याच लॉजवर घेऊन गेला. चांदने पुन्हा एकदा नाझशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

नंतर नाझने कोर्ट मॅरेजबद्दल विचारल्यावर चांदने पलटी मारली व आपलं कोर्ट मॅरेज होणार नाही, त्यापेक्षा आपण घरातल्या लोकांना समजावून सांगू, असे तो तिला बोलू लागला. तिची समजूत काढून तो पुन्हा अहमदाबादला निघून गेला. नाझ त्याला सतत फोन करत होती. त्यांच्याबद्दल घरातल्या लोकांना सांगितलं का, असं विचारत होती. पण प्रत्येक वेळी ही गोष्ट तो टाळत होता. माझ्या घरातील लोक या लग्नाला तयार नाहीत. माझ्यासाठी मुलगी शोधत आहेत, असं तिला सांगून चांद नाझला टाळू लागला.

नाझने ठरवलं की, अहमदाबादला जाऊन त्याला भेटायचं. ती मुंबईवरून गेली व त्याला भेटली. तेव्हा त्याने आपलं लग्न ठरलेलं आहे, असे सांगितले आणि ती विचारायला आली म्हणून तिला मारझोडही केली. यावेळी तिच्या लक्षात आलं की, प्रेमाच्या नावाखाली आपली फसवणूक झालेली आहे. पण तोपर्यंत फार उशीर झालेला होता.

लग्नाचे आमिष दाखवून नाझला चांदने आपल्या जाळ्यात अडकवलेलं होतं. अशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतरच तो लग्नाला तिला नकार देऊ लागलेला होता. नाझ हिने मुंबईला येऊन चांद विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली व मुंबई पोलिसांनी चांद विरुद्ध ३७६ गुन्हा दाखल करून घेतला व या गुन्हामध्ये त्याला अटकही करण्यात आली. लग्नाचं अामिष दाखवून अशी कितीतरी तरुण मुले आपल्या प्रेमाच्या जाळ्यात मुलींना फसवतात व त्यांची फसवणूक केल्यानंतर अक्षरश: मुलींच्या मनाच्या स्थितीचा न विचार करता आपल्या आयुष्यातून दूर लोटतात. तोपर्यंत प्रेमात वेड्या झालेल्या मुलींना आपली फसवणूक होत आहे, याची जराही चाहूल त्यांना लागत नाही. ज्यावेळी चाहूल लागते, त्यावेळी त्यांचे आयुष्य बरबाद झालेले असते.

(सत्य घटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -