प्रा. प्रतिभा सराफ
लहानपणापासून मला फ्रॉक घालायला फार आवडायचं. मोठी झाल्यावर आईने रागावून, नातेवाइकांनी समजावून आणि मैत्रिणींनी परत परत सांगून, चिडवून माझे फ्रॉक घालणे कमी झाले. तरी दिसेल त्या फ्रॉककडे वळून बघायची सवय काही कमी झाली नाही. कालांतराने माझं लग्न झालं. मुलगी झाली. मुलगी झाल्याचा विशेष आनंद होता, कारण माझं घर तऱ्हेतऱ्हेच्या डिझाईनच्या विविध रंगांच्या फ्रॉकनी भरून जाणार होतं. ‘आई’ झाल्याचा माझा आनंद द्विगुणित झाला होता.
मुलगी दोन वर्षांची होती. त्यावेळेचा एक प्रसंग : बाजारातून जाताना एक छोटसं फ्रॉक्सचं दुकान दिसलं. माझी पावलं अडखळली. असला ग्राहक दुकानदाराने बरोबर हेरला. तो मला म्हणाला,
“आईये ना अंदर और भी बहुत व्हरायटी है.”
“नहीं… कुछ नहीं… ऐसेही देख रही थी.” मी चाचरत बोलले.
“देखो… देखो… देखने का थोडी ना पैसा लगता है.”
तो हसत हसत बोलला बहुधा सिंधी भाषिक असावा. पन्नाशीच्या वयातील त्याची चपळता वाखाणण्याजोगी होती. मग काय खूप फ्रिल असलेला गुलाबी रंगाचा एक फ्रॉक घासाघीस करून विकत घेतला. पावती मागताच म्हणाला,
“बहनजी दो महिने के बाद आयेंगे तो भी बदली करके दूंगा.”
त्याच्या सात्विक चेहऱ्याकडे पाहिले कागदी पावतीपेक्षा शब्दांची पावती सोबत घेऊनच बाहेर पडले. तो फ्रॉक मुलीला झाला नाही. शिवाय दीड-दोन महिने बाजारातही जायला मिळाले नाही. एक दिवशी रिक्षा थांबवून त्याला तो फ्रॉक परत केला. तरीही त्याने तो लगेच परत घेतला. त्या दिवशी दुसरा फ्रॉक शोधायला मला वेळ नव्हता म्हणून “दोन-चार दिवसांनी येते.” सांगून गेले.
मग पुन्हा पंधरा दिवस मला वेळच मिळाला नाही आणि जेव्हा मी तिथे गेले, तेव्हा तिथे दुकानच नव्हते. त्या जागी चक्क भांड्याचे दुकान होते. पुढे-मागे पाहत त्या भांड्याच्या दुकानदाराला विचारले, तर तो म्हणाला की, रेडिमेड फ्रॉकवाला दुकान सोडून गेलाय. मी तिथेच उभे राहिले, तर तो काहीतरी आठवून म्हणाला,
“आप दोसो रुपये वाली भाभी?”
मी लगेच “हो” म्हटले. तो म्हणाला,
“उन्होने कहा था, एक भाभी दोसो रुपया लेने के लिए आयेगी.”
त्यांनी लगेच २०० काढून मला हातात दिले. आज विचार करते आहे की, एका दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराकडे पैसे दिले. पण त्यानेही तितक्याच प्रामाणिकपणे परत केले. म्हणजे विश्वास आणि प्रामाणिकता अजूनही टिकून आहे तर!