Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखग्रंथालये : भाषेच्या अस्तित्वाची खूण

ग्रंथालये : भाषेच्या अस्तित्वाची खूण

डॉ. वीणा सानेकर

ग्रंथालयांना कोणत्याही भाषेच्या संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ग्रंथालये वाचन संवर्धनाकरिता अनेक अंगांनी सहाय्यभूत ठरतात. शहरी भागांमध्ये अनेक मोठ्या शाळा, महाविद्यालयांमध्ये सुसज्ज ग्रंथालये असतीलही. पण छोट्या शाळांमध्ये स्थिती वेगळी आहे. ग्रामीण भागात उत्तम ग्रंथालय सुविधांकरिता झगडावे लागते. आदिवासी आश्रमशाळांमध्ये तर ग्रंथालय नावाची गोष्ट उभारणे आव्हानात्मक असते. आर्थिक पाठबळाचा अभाव, जागेची चणचण अशा प्रश्नांतून वाट काढत मुलांकरिता वाचनाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे सोपे नाही.

रत्नागिरीचे मराठीसाठी धडपडणारे कार्यकर्ते विलास डिके त्यांच्या शाळेकरिता परिश्रम घेऊन पुस्तके जमवतात. ग्रामीण भागात अनेक शाळांमध्ये पुस्तक पेटीचा प्रयोग केला जातो. वर्गा-वर्गांतून पुस्तक पेटी मुलांकरिता खुली केली जाते आणि हा खजिना मुले आनंदाने लुटतात.

खरे तर पुस्तकांची पेटी अशा शाळांकरिता उपलब्ध करून देणे कठीण नाही. समाज म्हणून मुलांच्या वाचनाची भूक भागवण्याकरिता आपण मोठे योगदान देऊ शकतो. तशी आस्था नि कळकळ मात्र हवी. शहरांमध्ये कितीतरी पुस्तके सहज रद्दीत दिली जातात नि खेडोपाड्यांमध्ये रंगीत पुस्तकांमधली अक्षरे वाचण्यासाठी मुले आसुसलेली असतात.

ग्रंथालय संस्कृतीबाबत अतिशय विसंगत वास्तव ठिकठिकाणी दिसते. काही ठिकाणी भरभरून पुस्तकसंग्रह असतो, समृद्ध वाचनालये असतात. पण ग्रंथालयांमधला कर्मचारी वर्ग पुस्तकांची कपाटे उघडण्याची तसदीही घ्यायला तयार नसतो.म्युझियममध्ये सजवल्यासारखी पुस्तके केवळ पडून असतात.पुस्तके वाचकाकरिता वाट पाहत असतात. पण अनेकदा त्यांच्याकडे निर्जीव वस्तू म्हणून पाहिले जाते. ती आपल्याशी बोलतात, सल्ला देतात, मार्ग दाखवतात, हितगुज करतात. हवे ते संदर्भ वाचकाला शोधून देणे हे ग्रंथालयीन कर्मचारी वर्गाचे काम असते. पण तसे कष्ट घेणारे कमी असतात.

संशोधकांचे संशोधन खरे तर अशा प्रामाणिक कर्मचारी वर्गामुळेच यशस्वी होते.संशोधक आणि अभ्यासक अचूक नि उचित संदर्भांच्या शोधात असतात आणि न थकता, न कंटाळता प्रामाणिकपणे काम करणारे कर्मचारी ग्रंथालयाला चैतन्य देतात.

नव्या नव्या पुस्तकांचे स्वागत कसे करायचे, वाचकांची अभिरुची कशी वाढवायची, सर्व साहित्य प्रकारांमधली दालने अधिक समृद्ध कशी करायची, असे विविध पैलू ग्रंथालयांशी निगडित आहेत. ग्रंथालये स्वच्छ, सुंदर प्रकाशाने उजळलेली, वाचकांना आकर्षून घेणारी असायला हवीत. ती तशी असावीत म्हणून शासनाने, संस्था, शाळा – महाविद्यालयांनी सातत्याने प्रयत्न करायला हवेत.

काही ठिकाणी ग्रंथालये असतात, पुस्तके असतात, पण दिवसाचे दिवस पुस्तकांवरची धूळ झटकलेली नसते, तर काही ठिकाणी केवळ अस्ताव्यस्तपणे ती विखुरलेली असतात.पुस्तकांकरिता निधी वा अनुदान योग्य प्रकारे वापरले गेले नाही, तर त्याचा काय उपयोग? ग्रंथालयांचा निधी ही संपत्ती असते. त्यामुळे त्या निधीचा विनियोग काळजीपूर्वक केला गेला.

बदलापूरच्या ग्रंथसखा वाचनालयाला मी भेट दिली होती.श्याम जोशी नावाच्या माणसाने ग्रंथांचा सखा होऊन जी वास्तू उभारली, ती पाहून मी थक्क झाले.किती निगुतीने विषयवार रचलेली पुस्तके! तिथे एका विषयाचे संदर्भ शोधताना तिथे घालवलेले तिनेक तास आजही आठवतात. नीरव शांतता आणि अवतीभवती केवळ पुस्तके.

जुम्मापट्टीच्या आश्रमशाळेत शिबिरानिमित्ताने गेलो होतो तेव्हा तिथे वाचनालय नव्हते. माझ्या राजेश्वरी नावाच्या मैत्रिणीने त्याकरिता पुढाकार घेतला नि पाहता पाहता छोटे ग्रंथालय आकाराला आले.

दरवर्षी आम्ही मित्रमैत्रिणी मिळून त्यात भर घालू लागलो. या शाळेत जवळून अनुभवले की, पोटाची भूक जशी भागली पाहिजे तशी योग्य वयात वाचनाची भूक देखील शमली पाहिजे. म्हणून तर ग्रंथालयांचे महत्त्व !

मात्र हेही लक्षात घेतले पाहिजे की, वाचकांकरिता ग्रंथालय हवे तसेच ग्रंथालयांकरिता वाचकही हवा. मराठीबाबत चिंता वाटते ती वाचकाची. मराठी पुस्तकांचा वाचक घडला तरच ग्रंथालये जगतील. नि ती जगणे म्हणजे आपल्या भाषेच्या अस्तित्वाची खूण अजरामर असणे!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -