Monday, October 7, 2024
Homeसाप्ताहिककोलाजज्योत से ज्योत जगाते चलो...

ज्योत से ज्योत जगाते चलो…

अनुराधा दीक्षित

आमचा एक महिला साहित्यिक समूह आहे. सगळे हात लिहिते आहेत. कोणी शिक्षिका, कोणी डॉक्टर्स, कोणी वकील, कोणी समुपदेशक, तर कोणी गृहिणी. पण आम्हा सगळ्यांना बांधून ठेवणारा एक समान धागा म्हणजे लेखन! पण या व्यतिरिक्तही आमच्या सख्या शैक्षणिक, सामाजिक, कला, संस्कृती अशा प्रांतातही मुशाफिरी करीत असतात आणि तिथेही आपला ठसा उमटवित असतात. यावेळीही आमच्या एका मैत्रिणीने राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा उमटवला. आम्ही तिला आमच्या समूहातर्फे मानपत्र देऊन तिचा सन्मान केला आणि तिच्या या कामाबद्दलचे अनुभव तिच्याच तोंडून ऐकले. तेव्हा खूपच अभिमान वाटला तिचा!

ती माझी मैत्रीण आहे ज्योती तोरसकर! मालवणची! पेशाने शिक्षिका. विद्यार्थीप्रिय. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटणारी, नवनवीन प्रयोग करून त्यांचं व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी मेहनत घेणारी! उत्कृष्ट निवेदिका, सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर पी.एच.डी.साठी संशोधन करणारी आणि महत्त्वाचं म्हणजे ती ज्या मालवणमध्ये राहते, तिथल्या समुद्रात पारंपरिक रितीने मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी, समस्या यांचाही अभ्यास करणारी!

तर तिच्या या मच्छीमारांसंबंधीच्या कार्याची दखल घेऊन तिला एक अनपेक्षित अशी संधी चालून आली ती जिनीव्हा येथे होणाऱ्या जागतिक परिषदेसाठी जाण्याची.

भारतातर्फे जाणाऱ्या प्रतिनिधी मंडळातील एक प्रतिनिधी म्हणून. तिथे तिला मच्छीमारांच्या समस्या, अडचणी मांडायच्या होत्या. इथल्या मच्छीमारांना मोठ्या व्यवसायासाठी नव्हे, तर स्वतःचं पोट भरण्यासाठी मच्छीमारी करावी लागते. आर्थिकदृष्ट्या ते सक्षम नाहीत.जागतिक बँकेकडून विविध देशांतील अशा घटकांना मोठा निधी उपलब्ध करून दिला जातो. पण त्यासाठी तो निधी का मिळाला पाहिजे, का आवश्यकता आहे, हे पटवून देण्यासाठी या प्रतिनिधींना सर्वंकष अभ्यास करून आकडेवारीसकट तिथे मुद्देसूद आपले म्हणणे पटवून द्यावे लागते. गेलेल्या सगळ्याच प्रतिनिधींना तिथे बोलायची संधी मिळते असे नाही. ठरावीक ३-४ जणांनांच ती मिळते. सुदैवाने आमच्या ज्योतीला ती संधी मिळाली आणि अक्षरशः तिने त्याचं सोनं केलं. पण त्या प्रतिनिधींना आधी फ्रान्समध्ये नेऊन तिथे त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली.

त्या प्रतिनिधींचे म्हणणे मांडून झाल्यावर त्या देशाचे प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख म्हणून जे मंत्री स्तरावरील व्यक्ती असतात, ते मुख्य परिषदेत प्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्यांचा परामर्श घेत जागतिक बँकेकडे आपल्या संपूर्ण देशातील विशिष्ट क्षेत्रांसाठी निधीच्या आवश्यकतेची मागणी लावून धरतात. त्याचा योग्य प्रभाव पडला, तर जागतिक बँक अक्षरशः अब्जावधी रकमेची मागणी मान्य करते. या परिषदेत आपल्या देशाचे मुख्य प्रतिनिधी म्हणून आदरणीय मंत्रीमहोदय पीयूषजी गोयल उपस्थित होते. त्यांनीही अशा अनुदानाची मागणी लावून धरली आणि ती मान्यही झाली. त्यामुळे ज्योतीप्रमाणेच इतर प्रतिनिधींनी आपल्या भाषणातून व्यक्त केलेले विचार सर्वांना पटले. त्यामुळेच त्यांची जिनीव्हा ट्रीप सुफळ संपूर्ण झाली! तिची मेहनत, अभ्यास, भाषणकौशल्य या सगळ्यांचीच कसोटी लागली होती.

तिचं नावच ज्योती आहे. ज्योती म्हणजे तेज, प्रकाश! आपल्या ज्ञानाचा प्रकाश तिने अशा प्रकारे पाडला. ज्योतीच्या कर्तृत्वाचा परिघ आता वाढलाय. त्यामुळे तिच्याकडून अधिक सकारात्मक आणि भरीव कामगिरी होण्याबद्दल सर्वांच्या अपेक्षा उंचावल्यात. त्यासाठी तिला खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!

तिथल्या अनुभवांबद्दल सांगताना तिने विदेशातील काही गोष्टींची निरीक्षणं तिथे रोजच्या व्यवहारात बोलताना फक्त फ्रेंच भाषाच वापरली जाते. इंग्रजी कोणी बोलत नाही. त्यामुळे इंग्रजीत बोलणाऱ्याला ते उत्तरच देत नाहीत. इतका आपल्या भाषेचा त्यांना अभिमान आणि प्रेम आहे! आपल्या देशातील स्वभाषेच्या अभिमानाची तुलना इथे करून बघण्यासारखी आहे, नाही का?

तिथे पाणी अतिशय स्वच्छ राखलं जातं. जिथे पाण्याचे विविध स्त्रोत आहेत, तिथून ते पाइपद्वारा सगळीकडे पुरवलं जातं. जे पाणी बेसिनमध्ये हात धुण्यासाठी वापरतात, तेच इतकं शुद्ध आणि स्वच्छ असतं की, पिण्यासाठी वेगळ्या पाण्याची सोय करावी लागत नाही. त्यामुळे सार्वजनिक नळावर अगदी पोलीस शिपायांपासून ते मंत्र्यांपर्यंत तिथलंच पाणी पितात! ते लोक खूप पर्यावरणप्रेमी आहेत. त्यामुळे चारचाकी गाड्यांची संख्या खूप कमी, तर सायकलस्वारांची संख्या जास्त! शिस्तीने वागणारे आणि नियमांचे काटेकोर पालन करणारे तिथले लोक आहेत. रस्ते अतिशय स्वच्छ आणि प्रशस्त व सुंदर आहेत.

ज्योतीने एक वात पेटवली आहे. आपणही आपल्या परिसरातील काही सामाजिक प्रश्न आपल्या पातळीवर हाताळू शकतो. किमान आपल्या लेखन, भाषणातून त्यांना वाचा फोडू शकतो. सगळ्यांनाच ज्योतीसारख्या संधी मिळतील असं नाही. तरी आपली एखादी पणती आपण नक्कीच लावू शकतो, खारीचा वाटा उचलू शकतो नाही का? ज्योत से ज्योत जगाते चलो…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -