Sunday, July 21, 2024

इम्युनिटी

डॉ. लीना राजवाडे

मागील लेखात आपण पावसाळ्यात कशा पद्धतीने खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे हे बघितले. साधारण कोणत्याही ऋतूचा काळ हा दोन महिन्यांचा, ६० दिवसांचा असतो. यात पहिल्या ऋतूचा शेवटचा आणि दुसरा ऋतूचा पहिला आठवडा हा ऋतुसंधी काळ समजला जातो. त्यावेळी पूर्वीच्या ऋतूचा विधी क्रमाने सोडावा व दुसरा विधी क्रमाने सुरू करावा. पावसाळ्यात जे नियम सांगितले आहेत ते पुढे अश्विन महिन्यात शरद ऋतू सुरू होताना अचानक बदलू नयेत. हळूहळू बदल करावेत. याचा मुख्य फायदा ऋतू संधीकाळात होणारे आजार त्रासदायक होत नाहीत. नैसर्गिक व्याधिक्षमत्व चांगले राहते. आजच्या लेखाचा विषयही आहे, हे व्याधिक्षमत्व किंवा इम्युनिटी.

कोविडसारख्या महामारीच्या कालावधीत सर्वच वयोगटासाठी महत्त्वाचा विषय ठरतो आहे, तो म्हणजे इम्युनिटी.
“Prevention is better than cure” “याला आज पुन्हा एकदा नव्याने महत्त्व येत आहे. त्यासाठी ही इम्युनिटी म्हणजे काय हे अधिक तपशिलाने समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. त्यात विशेष जाणून घेऊ, ·माणसाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे काय. प्रतिकारशक्ती नेमकी कशी काम करते.

प्रतिकारशक्ती किती प्रकारची असते? प्रतिकारशक्ती कमी कशामुळे होते?

आधुनिक शास्त्र प्रणालीनुसार माणसाच्या शरीरात आजार निर्माण करणारे सूक्ष्म जीवाणू किंवा विषाणू, जे सर्दी, ताप यासारखे आजार ते अगदी कॅन्सर, कोविडपर्यंत रोग होतात, त्या विषाणूंना प्रतिकार करणारी आणि सशक्त पेशींचे संरक्षण करणारी प्रणाली म्हणजे इम्युनिटी होय.

या प्रणालीचे मुख्यत: दोन स्तरावर काम चालते.

१ – माणसाला होणारे आजार त्याची तीव्रता कमी करणे.
२ – आजार होऊ नये यासाठी अटकाव किंवा प्रतिबंध करणे.

इम्युनिटीचे तीन प्रकार मानले जातात.

१ – जन्मत: असणारी(Innate),
२ – वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणारी (adaptive),
३ – दुसरा कोणता तरी स्रोत त्यापासून मिळणारी (passive) ही थोडा काळ टिकते. व्हॅक्सिनेशन ही या प्रकारात गणली जाते. इम्युनिटी कमी कशामुळे होते.

कुपोषण वारंवार येणारा ताप, मद्यपान तंबाखूचे व्यसन, जंतुसंसर्ग वारंवार होण्याची तक्रार. तसेच वय, लिंग, कुटुंबात आढळणारे जेनेटिकल असल्यास इम्युनिटी कमी होण्याची, पर्यायाने अनारोग्याकडे माणसाच्या आयुष्याची वाटचाल होताना दिसते.

Vaccine Immunity – विशिष्ट प्रकारचा विषाणू विरुद्ध शरीराने केलेला प्रतिकार त्याला चालना देण्याचे काम व्हॅक्सिन करते. विटामिन सी आणि विटामिन डी या गोष्टीदेखील anti-histamine, anti-inflammatory, immune strengthening म्हणून मदत करतात.

भारतीय वैद्यक प्रणाली याबद्दल काय भूमिका मांडते, हेही यानिमित्ताने जाणून घेऊ. भारतीय वैद्यक शास्त्र संहिता यावर खूपच शास्त्रोक्त, विचारपूर्वक विवरण करतात. जे आजही जनरल फिजििशयन असो किंवा विशिष्ट शाखेचा तज्ज्ञ. प्रत्येकाला क्लिनिकमध्ये तपासणी करताना रुग्ण किती बरा होईल, आपली चिकित्सेची मर्यादा काय? याचा नेमका अंदाज घ्यायला उपयोगी असते, ते परिमाण म्हणजे व्याधिक्षमत्व. आज अनेक नवीन व्याधी किंवा आजारांची नावे आपण वाचत आहोत. विशेषकरून विषाणूजन्य आजारांची जंत्री तर वाढतेच आहे. पण यात स्वस्थ निरोगी लोक आणि काही आजार होत असणारे रोगी दोघांना या विषाणूंचा संसर्ग होताना दिसतो. मग याचे मुख्य कारण असते इम्युनिटी. तुलनेनी बघितले, तर लक्षात येईल, आहारातील पथ्या पथ्य सांभाळल्यास निरोगी लोक लवकर बरे होतात. याचा अर्थ नैसर्गिक प्रतिकारशक्ती आजारातून बरे व्हायला नक्की मदत करते. यासाठी दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहार-विहार नीट तपासून, मग योग्य ती औषधी योजना वैद्याने किंवा डॉक्टरने केली पाहिजे, किंबहुना ती करणे अपेक्षित आहे. हेही या लेखाच्या निमित्ताने नमूद करावेसे वाटते. अतिस्थूल, अतिबारीक, ज्याचे मांस आणि रक्त हे धातू सशक्त नाहीत, जे अशक्त आहेत, असात्म्य आहारानी ज्यांचे पोषण झाले आहे, जे मनानी पण कमकुवत असतात त्यांची इम्युनिटी कमीच असते. त्यांनी रसायन, आहाराबरोबर पोषक गोष्टी, आपल्या प्रकृतीला योग्य, वैद्याला विचारून घ्यावीत. ज्याचा उपयोग रोग झाला तरी त्याची तीव्रता न वाढता तो सौम्य होण्यास फायदा होऊ शकतो. चंगळवाद कमी करण्याचा प्रयत्न, ऋतुसंधिकाळात आहारातील पथ्या पथ्य पाळल्यास, रसायन गोष्टीचा समावेश केल्यास, नैसर्गिक व्याधीक्षमत्व टिकायला मदत होऊ शकते.

आजची गुरुकिल्ली – शरीर हे खाल्लेल्या अन्नापासून बनते आणि आजारही याच अन्नामुळे होतात.

आहारसंभवं वस्तू रोगाश्च आहारसंभवः।

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -