सुकृत खांडेकर
भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी २५ जुलै रोजी संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेतली आणि देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी समाजातील पहिली महिला अधिकार रूढ झाली. शपथविधीनंतर त्या म्हणाल्या – मैं जिस जगहसें आती हूँ, वहाँ प्रारंभिक शिक्षा भी सपना होता हैं. गरीब, पिछडें, मुझे अपना प्रतिबिंब दिखाने हैं. मैं भारत के युवाओं और महिलाओं को विश्वास दिलाती हूँ की, इस पदपर काम करते हुए उनका हित मेरे लिए सर्वोपरी रहेगा। राष्ट्रपती के पद तक पहुंचना मेरी निजी उपलब्धी नही है. यह देश के सभी गरीबों की उपलब्धि है की, भारत के गरीब न केवल सपने देख सकता है, बल्की उन सपनों का पुरा भी कर लेता है.
राष्ट्रपतींचा शपथविधी हा संसदीय परंपरेतील एक मौल्यवान कार्यक्रम असतो. मावळते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रीगण, संसद सदस्य अशा मान्यवर अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत तो पार पडतो. द्रौपदी मुर्मूंच्या शपथविधीला त्यांच्या कुटुंबीयांसह ओरिसाच्या मयुरभंज जिल्ह्यातील ६४ जण पाहुणे म्हणून उपस्थित होते. सन २०१५ मध्ये द्रौपदी यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली तेव्हा रांची आणि ओरिसातील मयुरभंज जिल्ह्यातून तीन हजार लोक खास पाहुणे म्हणून त्या सोहळ्यास हजर होते.
राष्ट्रपतींचा शपथविधी हा २५ जुलैला होतो, ही सुद्धा गेली चार दशकांची परंपरा आहे. २५ जुलैला शपथ घेणाऱ्या मुर्मू या भारताच्या दहाव्या राष्ट्रपती आहेत. इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीनंतर १९७७ मध्ये केंद्रात जनता पक्षाचे सरकार आले. तेव्हा देशाचे सहावे राष्ट्रपती म्हणून नीलम संजीव रेड्डी यांचा २५ जुलै १९७७ रोजी शपथविधी झाला होता. त्यानंतर ग्यानी झैलसिंग, आर. वेंकटरमण, शंकर दयाळ शर्मा, के. आर. नारायणन, ए. पी. जे अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद, या सर्व राष्ट्रपतींनी २५ जुलै याच तारखेला शपथ घेतली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्मलेल्या द्रौपदी या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. आजवर त्या सर्वात वयाने लहान म्हणजे ६४ वर्षांच्या आहेत. निवडणुकीत त्यांना ६ लाख ७६ हजार ८०३ (६४ टक्के), तर त्यांचे प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना ३ लाख ८० हजार १७७ (३६ टक्के) मते मिळाली.
दि. २१ जून २०२२ रोजी ओरिसामधील मयुरभंजचे भाजपचे जिल्हाध्यक्ष विकास महतो हे त्यांच्या दुकानावर असताना लँडलाइनवर फोन वाजला. पीएम साहेबांना द्रौपदी मॅडमशी बोलायचे, असा निरोप मिळाला. विकास धावतच द्रौपदी यांच्या घरी गेले. त्यांना घेऊन दुकानावर आले. पाच मिनिटांतच पुन्हा फोन वाजला. केवळ एक मिनिटभर मॅडम फोनवर बोलणे ऐकत होत्या. तो ऐकताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या एकदम शांत झाल्या. त्यांच्या मुलीने त्यांना आधार दिला. त्यांनी स्वत:ला सावरले. एवढी मोठी बातमी मी आपल्या जवळ ठेवू शकत नाही, असे त्या म्हणाल्या. त्या खूप भावुक झाल्या होत्या. विकासचे वडील रवींद्रनाथ महतो, यांनीच द्रौपदी यांना राजकारणात आणले.
स्थानिक निवडणुकीत द्रौपदी नगरसेविका झाल्या, नंतर राज्यपालही झाल्या आणि आता थेट राष्ट्रपती भवनात…द्रौपदी या राज्यपाल असताना विकासने त्यांचा पीए म्हणून काम केले होते. त्यांना पीएमओमधून आलेल्या फोननंतर अर्ध्या तासातच द्रौपदी मुर्मू या एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून दिल्लीतून घोषणा झाली. त्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची गर्दी जमू लागली.
द्रौपदी मूर्मू यांच्याशी पंतप्रधानांना संवाद साधायचा होता, मग त्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांशी का संपर्क साधला, थेट द्रौपदी मॅडमना फोन का केला नाही, असा प्रश्न अनेकांना पडला. पण द्रौपदी मॅडमच्या घरी फोनची रेंज नसते. अनेकदा त्यांच्या घरी फोन लागत नाही, विकास महतोचा फोन नंबर पीएमओकडे त्यांचे पीए म्हणून नोंदवलेला होता. म्हणून पंतप्रधानांच्या निवासस्थानातून आलेला फोन थेट विकासच्या दुकानात आला. रवींद्रनाथ महतो हे १९७७ मध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या आग्रहावरून द्रौपदी यांनी रायरंगपूर वॉर्ड क्रमांक २ मधून निवडणूक लढवली व त्या नगरसेविका झाल्या. त्यांचे पती श्याम चरण मुर्मू यांना द्रौपदीने राजकारणात प्रवेश करणे पसंत नव्हते. ते म्हणायचे, राजकारण आमचे काम नाही. आम्ही खूप लहान माणसे आहोत. महिलांनी तर राजकारणात येणे योग्य नाही. तेव्हा द्रौपदी या शिक्षिका होत्या व त्यांचे पती बँकेत मॅनेजर होते.
रवींद्रनाथ महतो यांचा दोन टर्म भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यकाल पूर्ण झाला, तेव्हा त्यांनी त्या पदाची जबाबदारी द्रौपदी यांच्यावर सोपवली होती. द्रौपदी यांच्या दोन्ही मुलांचा अकाली मृत्यू झाला तेव्हा त्या मनाने खूप दु:खी झाल्या. आपण मुलांसाठी वेळ देऊ शकलो नाही, अशी त्यांना खंत लागून राहिली. राजकारण सोडून देण्याचा त्या विचार करू लागल्या, तेव्हा, त्यांच्या वडिलांनी त्यांना धीर दिला. नियतीने तुझ्यावर दुसरे काम सोपवले आहे, ते मनापासून करीत राहा, असा सल्ला त्यांना दिला.
ओरिसातील रायरंगपूर ते राजधानी दिल्लीतील रायसिना हिलवरील राष्ट्रपती भवन हा द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास विलक्षण आणि आश्चर्यकारक आहे. केंद्रात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रात गृहमंत्री अमितभाई शहा आहेत, यामुळेच दुर्गम भागात राहणारी आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकली. द्रौपदी यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा ओरिसातील त्यांचे पहाडपूर गाव एकदम प्रकाशात आले. देशातून टीव्ही चॅनेल्सचे पत्रकार त्यांच्या कॅमेरासह तिकडे धावले. गावाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला फलक लागले होते. राष्ट्रपतीपद की प्रार्थनी द्रौपदी मुर्मू, पहाडपूर गांव आप का स्वागत करता है…. त्या फलकावर द्रौपदी यांचा फोटो होता. ओरिसाचे दोन महान कवी सच्चिदानंद व सरला दास यांच्या काव्यपंक्ती त्या फलकांवर कोरल्या होत्या.
द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा होताच, सोशल मीडियावर त्या रायरंगपूरच्या एका मंदिरात झाडू मारत आहेत असा फोटो सर्वत्र व्हायरल झाला. त्या रोज सकाळी साडेतीन वाजता उठतात. मॉर्निंग वॉक करतात, नंतर योगा करतात. रोज शिवपूजा करतात. आपल्या मुलांच्या मृत्यूनंतर त्या अध्यात्मात जास्त वेळ घालवू लागल्या. त्यांनी तेव्हाच मांसाहार सोडला. आता तर कांदा-लसूनही त्या खात नाहीत. त्या स्वत: पोळी – भाजी असे साधे उत्तम भोजन बनवतात. घरी येण्यापूर्वी त्या अनेकदा निरोप देत, परवाल और सजना का साग बनाना.… द्रौपदी यांचे शाळेत जाण्यापूर्वी नाव वेगळेच होते.
द्रौपदी हे नाव त्यांच्या घरातील लोकांनी नव्हे, तर शाळेतील शिक्षकांनी ठेवले. ६४ वर्षांपूर्वी ओरिसातील दुर्गम भागात जन्मलेल्या या मुलीचे नाव पुत्ती होते. ग्रामीण व आदिवासी भागात अशी घरगुती नावे ठेवण्याचीच पद्धत होती. पाच वर्षांपर्यंत पुत्ती या नावानेच तिला ओळखले जायचे. शाळेत घातल्यावर तेथील शिक्षक मदन मोहन महंतो यांनी पुत्ती नाव बदलून द्रौपदी अशी नोंद केली. ते शिक्षक चांगले होते, त्यांनीच मुलांची चांगली नावे ठेवली. द्रौपदी या शाळेपासून हुशार व चौकस होत्या. क्लास मॉनिटर म्हणून त्यांची निवड झाली होती. लहानपणीच्या क्लास मॉनिटर आता देशाच्या राष्ट्रपतीपदावर पोहोचल्या आहेत.