मुबई : भोसरी भूखंड प्रकरणावरुन खडसेंनी नाव घेता गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला होता. या आरोपांना भाजप नेते गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. मंत्री असतांना खडसेंनी गैरकृत्य केले, चुकीचे कामे केली, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला असून त्यामुळे ते चौकशीच्या फेऱ्यांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे त्यांचे जावई वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. राज्यात दुसरे संजय राऊत एकनाथ खडसे असल्याची खोचक टीकाही महाजन यांनी केली आहे.
आता फक्त कोर्टाची सक्तीची कारवाई नसल्यामुळे खडसे जेलमध्ये जात नाही. कोर्टाची ॲक्शन हटल्यावर जावयासोबत एकनाथ खडसे सुध्दा जेलमध्ये जातील, असा इशाराही गिरीश महाजन यांनी यावेळी दिला आहे. तर आम्ही त्यांना जेलमध्ये टाकतोय या खडसेंच्या म्हणण्याला कुठलाही अर्थ नाही. तुम्ही चौकशी समितीला सामोर जावून पुरावे दाखवा, पुरावे नसतील तर कारवाई होईल असही महाजन यांनी यावेळी सांगितलं.
महाजन म्हणाले की, एकनाथ खडसेंविरोधात कारवाई कुठल्याप्रकारे सत्तेचा गैरवापर नाही, त्यांच्या विरोधातील तक्रारी या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या आहेत. मात्र गेल्या काळात त्यांचे सरकार असल्याने या तक्रारी दाबल्या गेल्या होत्या. आता चौकशीत त्यात स्पष्टता येईल आणि कोण स्वच्छ आहे, कोणाचे हात बरबटले आहेत, ते सुध्दा समोर येईल, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.