Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत अंधारात असलेली १८ हजार गावे झाली प्रकाशमय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत अंधारात असलेली १८ हजार गावे झाली प्रकाशमय

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली माहिती

मुरबाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आठ वर्षांत कायम अंधारात असलेल्या १८ हजार ३७४ गावांपर्यंत प्रकाश पोचविला. तर केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने `उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ अंतर्गत केंद्र सरकारचे विद्युत मंत्रालय, महावितरण कंपनी यांच्या वतीने शहापूरपाठोपाठ मुरबाड तालुक्यातील धसई येथे ऊर्जा महोत्सव आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आठ वर्षांपासून देशभरात विविध योजना राबविल्या जात आहेत. प्रत्येक कल्याणकारी योजनांची परिणामकारक अंमलबजावणीवर पंतप्रधान मोदींचे लक्ष आहे. त्यामुळे गेल्या आठ वर्षांत भाजपाच्या एकाही मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला नाही, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देशातील १८ हजार ३७४ गावांमध्ये वीज पोचलेली नव्हती. आज १०० टक्के गावांमध्ये विजेद्वारे प्रकाश पोचला आहे.

मुरबाड तालुक्यात हुतात्म्यांचे स्मारक असलेल्या सिद्धगडावरही वीज नव्हते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तेथे वीज पोहचली. यापुढील काळात तेथे अभिमान वाटेल असे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. या स्मारकासाठी वन कायद्याची अडचण आहे. त्यामुळे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या वास्तू व स्मारकांसाठी वन कायद्यातून शिथिलता देण्याबाबत विनंती केली आहे. या स्मारकासाठी टप्प्याटप्प्याने काही परवानगी मिळाली आहे.”

स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्यासाठी हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जपण्याबरोबरच नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांचा आत्मविश्वास वाढविला. त्यामुळे जगात आज भारतीय ताठ मानेने उभा राहत आहे, असे ते म्हणाले. मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांच्या विजेच्या समस्या सोडविण्यासाठी १५ ऑगस्टनंतर विशेष बैठक घेण्यात येईल. या बैठकीला ग्रामस्थांनी तक्रारी घेऊन यावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी केले. तसेच विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेला कंत्राटी कामगार जितेंद्र पवार यांच्या पत्नीला नुकसानभरपाई व नोकरी देण्याचे निर्देशही राज्यमंत्री पाटील यांनी महावितरणचे मुख्य अभियंता औंढेकर यांना दिले.

दरम्यान, धसई येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण-मुरबाड रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची व रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेची पाहणी केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना खड्डे दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या.

केंद्राच्या नव्या योजनेत महाराष्ट्राला ३९ हजार कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर होणाऱ्या योजनेत महाराष्ट्राला पाच वर्षांसाठी ३९ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना कृषी पंप, वीज पुरवठ्यासाठी पोल आदी कामे करता येतील. उत्तम कार्य करणाऱ्या राज्यांना योजनेतील रक्कम पुर्णपणे अनुदान म्हणून दिली जाईल. मात्र, योग्य कार्य न करणाऱ्या राज्यांवर ती कर्ज म्हणून कायम राहील. त्यामुळे या योजनेत महाराष्ट्राने उत्तम कार्य करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी येथे केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -