नांदगाव (वार्ताहर) : श्रावण महिन्यास शुक्रवार पासून प्रारंभ झाला असताना पहिल्याच दिवसापासून मुरूडच्या मच्छी बाजारात राजपुरी येथून टोपलीच्या टोपलीने गटगटे बोंबील सकाळ पासून विक्रीस येताना दिसत होते.खुप दिवसांनी ताजे बोंबील काहीसे स्वस्त दरात उपलब्ध झाल्याने मांसाहारी खवय्ये मात्र खूष दिसून येत होते. बोंबील खरेदीसाठी बाजारामध्ये सद्यस्थितीत मोठी गर्दी उसळत आहे.
८० ते १०० रुपये वाटा या प्रमाणे बोंबील विक्री होताना दिसत होते होती. जोडीला छोटी कोलंबी आंबाड, लाल कोलंबी, बोईट मासळी, मांदेली आदी मासळी उपलब्ध झालेली दिसत होती. मुरूड मध्ये किलो प्रमाणे मासळी विक्री होत नाही.वाट्या प्रमाणे विक्री होत असते. चिकन, मटण दुकानांतून मात्र शुकशुकाट दिसत आहे. पावसाने उसंत घेतल्याने बाजारपेठेत वर्दळ दिसून येत होती. उथळ समुद्रातील मच्चीमारीतून बोंबील मिळत असल्याचे सांगण्यात आले.
१ ऑगस्ट पासून खोल समुद्रातील मासेमारी सुरू होणार असून त्यासाठी नौका सज्ज होताना दिसून येत आहेत. अजूनही समुद्र खवळलेला असून वादळाची चिन्हे दिसून येत आहेत. पावसाने घेतलेली उसंत ही आगामी काळात धोकादायक ठरू शकते, अशी माहिती बुजुर्ग मंडळींनी दिली.हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मानवी शरीरासाठी बोंबील ही मासळी उपयुक्त असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे. त्यामुळे बोंबील खाण्याकडे वाढता कल दिसत आहे.ऑगस्ट महिन्यात पापलेट सारखी मोठी मासळी मार्केटमध्ये येईल अशी माहिती मच्छिमारांनी दिली.श्रावण महिन्यात अनेक मंडळीं मांसाहार करीत नसल्याने मासळीच्या किंमतीदेखील कमी होतात.