कॉर्पोरेट गिफ्टिंगमधील अग्रेसर ‘अश्विनी शाह’

Share

अर्चना सोंडे

आपल्या भारतीय संस्कृतीत भेटवस्तूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजा-महाराजांच्या काळात ते खूश झाले की नजराणा देत. कालांतराने ही व्याख्या बदलली. रक्षाबंधन, भाऊबीज, दिवाळी पाडवा, रमजान ईद, ख्रिसमस अशा सणासुदीला आपल्या प्रियजनांस भेटवस्तू देण्य़ाची प्रथा सुरू झाली. कॉर्पोरेट विश्वात देखील भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. यास कॉर्पोरेट गिफ्टिंग असं म्हटलं जातं. कॉर्पोरेट गिफ्टिंग या क्षेत्रात एक उद्यास आलेलं नाव म्हणजे गिफ्टबडसची संचालिका अश्विनी शाह.

अश्विनीचे वडील रमेश भावसार हे महिन्द्रा अॅन्ड महिन्द्रामध्ये संशोधन आणि विकास विभागामध्ये कार्यरत होते. आई दीपा भावसार एक गृहिणी. अश्विनीचा जन्म नाशिकमधला, नाशिक पेठे विद्यालयात तिचं १० वीपर्यंतचं शिक्षण झालं. मग के. के. वाघ महाविद्यालयातून माहिती-तंत्रज्ञान विषयामधून पदविका प्राप्त केली. त्यानंतर तिनं इंजिनीयरिंग पूर्ण केलं. नाशिकमध्ये पुन्हा जाऊन तिने एमबीएची पदवी प्राप्त केली. अश्विनीने खूप शिकावं अगदी पीएच.डी. करावी, अशी आईची इच्छा होती, तर शिक्षणानंतर व्यवसाय न करता नोकरी करावी अशी बाबांची इच्छा होती.

अश्विनीने नोकरी केली, पण नोकरी करत असताना आपल्याला व्यवसाय करायचा आहे, हे तिने मनोमन ठरवलं होतं. एमबीए करत असताना सचिन पाचोरकर सरांनी शिकविलेले सारं काही तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. मार्केटिंग, सोशल एन्टरप्राईझेस सारं काही तिला चांगलं लक्षात होतं. पण त्यावेळी एमबीए केल्यानंतर ती एसबीआय लाईफ इन्शुरन्समध्ये मार्केटिंगमध्ये कामाला लागली. यानंतर अजून एक नोकरी केली. तिकडे तिची ओळख तिचा बॉस असलेल्या हर्षिलसोबत झाली. नोकरीच्या ७-८ महिन्यांनंतर तिने हर्षिलसोबत २०१६ मध्ये लग्न केले. हर्षिल नेहमी तिला म्हणायचा. “तू कर तुला हवं ते काम. सुरुवात तर कर. बाकी पुढे बघू.” नवऱ्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळे अश्विनीने नोकरी सोडून व्यवसाय करायचं निश्चित केलं. २०२२ मध्ये तिनं जुळ्या शौर्य आणि धैर्य या मुलांना जन्म दिला. या गरोदरपणाच्या काळात कंपनीने सर्वाधिक नफा कमविला.

सुरुवातीला व्यवसाय कोणता करावा हा प्रश्न होता. पण तो प्रश्नसुद्धा तिने सोडवला. पेपर बॅगची कल्पना तिच्या डोक्यात होतीच. त्यावर तिने काम करायला सुरुवात केली. दुकानदारांना भेटली. गुगलवर सर्च करून मिळेल त्या माहितीपर्यंत, दुकानांपर्यंत जाऊन रिसर्च केला. मग लक्षात आले या व्यवसायासाठी भांडवल खूप लागेल जे आपल्याकडे नाही. आणखी काहीतरी विचार केला पहिजे. याच दरम्यान अश्विनी विविध बिझनेस मिटिंग्ज करत होती. लोकांना भेटत होती. अशाच एका मिटिंगमध्ये तिला कॉर्पोरेट गिफ्टिंगबद्दल कळले. त्यानंतर तिने या विषयावर काम करायला सुरुवात केली. पण अगोदरसारखं रिसर्च करण्यात अधिक वेळ न घालवता थेट कामाला तिनं सुरुवात केली.

कॉर्पोरेट गिफ्टिंग सुरू करायचं, तर आता नावाचा विचार करावा लागेल. लोगो डिझाईन करा. रजिस्टर्ड करा. या सगळ्यात वेळ जाणार आणि पैसेही. यापेक्षा तिने सगळ्यांना आपण कॉर्पोरेट गिफ्टिंगचं काम करतोय हे सांगायला सुरुवात केली. समाज माध्यमांच्या सहाय्याने मित्र परिवार, नातेवाईक सगळ्यांना तिनं तिच्या कामाबद्दल सांगितलं. तिच्या ओळखीच्या एका स्टार्ट अप कंपनीने तिला दिवाळी गिफ्टिंगची पहिली ऑर्डर दिली. ती ऑर्डर तिने स्वतःचे ६ हजार गुंतवून पूर्ण केली. अश्विनीचा प्रवास असा सुरू झाला. मग पहिल्या ऑर्डरनंतरच तिने कंपनीचे नाव, लोगो रजिस्टर्ड केले. गिफ्टबड्स अशा प्रकारे जन्मास आली. हा व्यवसाय सुरू करण्यात हर्षिल, अश्विनी पाटील, प्रल्हाद राज या तिघांचा मोलाचा वाटा होता. पहिली ऑर्डर देणारे अश्विनी आणि प्रल्हादच होते ज्याचा आता ट्रॅव्हल क्षेत्रात व्यवसाय आहे.

पहिल्या ऑर्डरनंतर खऱ्या अर्थाने अश्विनीच्या कामाला सुरुवात झाली. ऑनलाइन जेवढे प्रॉडक्ट पाहता येतील ते पाहून त्यांच्या पत्त्यावर भेट द्यायला सुरुवात केली. हे आपले वेंडर होतील का? काय काय प्रॉडक्ट आहेत, सध्या मार्केटमध्ये…? कॉर्पोरेटमध्ये कोणत्या वस्तूची मागणी जास्त असते…? या सगळ्याचा अश्विनी अभ्यास करत होती. एमबीए करताना सोबत असलेल्या मित्र-मैत्रिणींना आपल्या कामाबद्दल अश्विनीने सांगितले असल्यामुळे ते ज्या कंपन्यांमध्ये काम करत तिकडे तुझी ओळख करून देऊ का? तू आमच्या एचआरसोबत बोलून घे. असा रेफरन्स देऊ लागले आणि मग तिला हळूहळू ऑर्डर यायला लागल्या. नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यापासून काही लोकं आपला व्यवसाय लपवून ठेवतात, सांगत नाहीत पण माझ्या बाबतीत तसं काही नाही. मी काय करते हे कळल्यानंतर सगळ्यांनीच खूप मदत केली. यामध्ये अश्विनीच्या बाबांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. आपल्या मुलीने नोकरी करावी असा त्यांचा कल होता, पण अश्विनीने व्यवसाय सुरू केल्यावर त्यांनी आपल्यापरीने तिला मदत केली.

कंपनी सुरू झाली. आता क्लायंटला डिलिव्हरी वेळ कसा द्यायचा हे मला कळायचे नाही. वेंडर किती दिवसांत वस्तू देईल याचा सुद्धा अंदाज यायचा नाही. एका क्लायंटने तर मला चांगलंच खडसावलं होतं. एका डॉक्टरची ऑर्डर होती आणि तिचे गिफ्ट अजून माझ्याकडे आले नव्हते म्हणून मी तिचे फोन घेणं बंद केलं होतं. ज्या दिवशी गिफ्ट आले तेव्हा तिला जाऊन थेट भेटले. तेव्हा तिने गिफ्ट घेतले पण पैसे देण्यास नकार दिला. अर्धे पैसे तिने मला आधीच दिले होते, पण मी फोन उचलत नाही, हे लक्षात आल्यावर ही मुलगी पैसे घेऊन पळून गेली की काय असे तिला वाटले. पण त्यामुळे मी शिकले होते. कमिटमेंट अशी द्यावी जी पूर्ण करता येईल आणि काही बदल असतील, तर क्लायंटला वेळोवेळी कल्पना द्यावी, ज्यामुळे विश्वास निर्माण होतो आणि टिकतोही.

कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये स्टेशनरी, डेक्सटॉप प्रोडक्ट, न्यू एम्प्लॉय वेलकम किट, दिवाळीमध्ये फूट प्रोडक्ट, एक्झिबिशन, न्यू प्रोडक्ट लॉन्च गिफ्ट हॅम्पर अशा विविध प्रकारच्या ऑर्डर गिफ्टबड्स करते. आतापर्यंत अश्विनीच्या गिफ्टबडसने शेकडो ग्राहकांना वेळेवर सेवा दिलेली आहे. निव्वळ भेटवस्तू नव्हे, तर व्यक्तीचा अभ्यास करून व्यक्तिनिहाय भेटवस्तू तयार करणे ही गिफ्टबडसची खासियत आहे. निव्वळ कॉर्पोरेटच नव्हे, तर लघू – मध्यम उद्योजकदेखील आपल्या ग्राहकांना या भेटवस्तू देऊ शकतात. भेटवस्तू दिल्याने नातेसंबंध दृढ होतात. अशा प्रकारची अनेक उदाहरणे अश्विनी सांगू शकते.

अश्विनीच्या या उद्योजकीय प्रवासात तिचे पती हर्षिल शाह यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन यामुळेच आपण हा टप्पा पार करू शकलो, असे अश्विनी प्रांजळपणे नमूद करते.

अनेकांना उद्योजक बनायचे असते पण भांडवल नाही, माहिती नाही, वातावरण नाही, पाठिंबा नाही अशी अनेक कारणे देत ते उद्योगात येत नाहीत. अशा या कारणशूर लोकांसाठी अश्विनीचा उद्योजकीय प्रवास डोळ्यांत अंजन घालणारा आहे. कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये अग्रेसर असणारी अश्विनी भावसार-शाह सारखी उद्योजिका ‘बॉस म्हणजे पुरुष’ हे चित्र बदलू पाहत आहे, हे कौतुकास्पद आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

7 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago