
नवी दिल्ली (हिं.स.) : भारतीय सैन्यदलांचा रोमहर्षक विजय साजरा करण्यासाठी आणि ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत, कारगिल प्रांतातील द्रासच्या पॉइंट ५१४० इथे सैनिकांनी गाजवलेले शौर्य आणि अत्युच्च बलिदानाचा यथोचित सन्मान करण्यासाठी, या पॉइंटला, “गन हिल’ असे नाव देण्यात आले आहे.
भारतीय सैन्याच्या तोफखान्याच्या तुकडीने, अचूक आणि प्राणघातक हल्ले करत शत्रूच्या सैन्यावर आणि पॉईंट ५१४० सह अनेक ठिकाणी त्यांनी घेतलेल्या संरक्षण कवच मोडून काढण्यात मोठा प्रभाव पाडला होता. ऑपरेशन विजय लवकर यशस्वी करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान होते.
तोफखाना तुकडीच्या वतीने, द्रासच्या कारगिल युद्धस्मारक येथे तोफखाना विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल टी. के. चावला यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या शस्त्रधारी वरिष्ठ सैनिकांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण केले. लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता, जनरल ऑफिसर कमांडिंग, फायर अँड फ्युरी कॉर्प्स यांनी देखील याप्रसंगी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले.
ह्या कार्यक्रमाला तोफखाना रेजिमेंटमधील सर्व दिग्गज सैनिक उपस्थित होते. या तुकडीला, ऑपरेशन विजयमध्ये "कारगिल" हा सन्मान मिळाला होता. यावेळी तोफखाना तुकडीचे कार्यरत अधिकारी देखील उपस्थित होते.