Wednesday, July 3, 2024

नांगर

रवींद्र तांबे

शेतात नांगरणी करण्यासाठी ‘नांगर’ हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे उपकरण आहे. तसेच शेतीप्रधान देशात नांगराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतीची कामे झाल्यानंतर शेतकरी स्वच्छ पाण्याने नांगर धुवून त्याची पूजा करून बैलांच्या गोठ्याच्या एका साईडला उभा करून ठेवला जातो. शेतकरी मुलाप्रमाणे नांगराची काळजी घेत असतात.

शेतामध्ये नांगरणी करताना नांगराने जमीन नांगरली जाते. यासाठी बैल किंवा रेड्यांच्या जोडीचा नांगरणीसाठी वापर केला जातो. मात्र, सध्याच्या सततच्या नैसर्गिक आपत्ती किंवा विविध संकटामुळे शेतकऱ्यांना बैल किंवा रेड्यांची जोडी परवडत नाही. त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यांचा पालन-पोषणासाठीचा खर्च सुद्धा उत्पादन खर्चापेक्षा जास्त येत आहे. तेव्हा सध्या लोक नांगरणी करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करू लागले आहेत.

ज्या शेतकऱ्याची जमीन जास्त आहे, असे शेतकरी स्वत: ट्रॅक्टर खरेदी करतात. तसेच ते ट्रॅक्टर भाड्याने देतात. मध्यम किंवा लहान शेतकरी तसेच खंडाने जमीन करणारे शेतकरी भाड्याने ट्रॅक्टर घेऊन आपल्या व खंडाने घेतलेल्या शेत जमिनीची नांगरणी करून घेतात. यामुळे बैलांसाठी गोठा बांधणे, चारा, पाणी, त्यांचे संगोपन इत्यादींसाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागता नाही.

सध्या तर बऱ्याच ठिकाणी शेतकरी जमिनीची नांगरणी ट्रॅक्टरने करीत आहेत. तेव्हा असेच जर चालले, तर पुढील आठ ते दहा वर्षांनी नांगर इतिहास जमा होणार, असे वाटू लागले आहे. बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातील शेतमळे ओसाड पडताना दिसत आहेत. कारण दिवसेंदिवस वाढणाऱ्या बैलांच्या किमतीचा विचार करता शेतकऱ्यांना बैल घेणेही परवडणार नाही. सध्या सर्रास शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करून शेती करीत आहेत. त्यामुळे नांगराचे अस्तित्व धोक्यात आहे, हे मात्र निश्चित. असेच चालले, तर काही वर्षांनी नांगर पाहायचा झाला किंवा नागर कसा असतो? हे पहाण्यासाठी वस्तू संग्रहालयात जावे लागेल. कारण नांगराची जागा आता ट्रॅक्टरनी घेतली आहे. तसेच अनेक ठिकाणी सुपीक जमिनीवर गगनचुंबी इमारती डोलताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटासुद्धा कमी होऊ लागला आहे. या निकषामुळे मागासलेल्या राष्ट्राचा विकास होत आहे, असे जरी वाटत असले तरी शेतीप्रधान देशाच्या दृष्टीने ते मारक आहे. यासाठी योग्य त्या उपाययोजना देशपातळीवर व्हायला हव्यात. त्यासाठी देशातील सन्माननीय राज्यकर्त्यांनी सामाजिक कार्यातून थोडी विश्रांती घेऊन प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आता नांगराविषयी माहिती घेऊ.

नांगर हा लाकडी असून त्याला जोडकाम करावे लागते. हे जोडकाम गावातील सुतार काम करणारा कारागीर उत्तम प्रकारे करतो. त्याला नांगर कसा जोडायचा, याची पूर्ण माहिती असते. आठ ते दहा फुट लांबीची सागाची लाकडी पट्टी, तिला ‘ईसाड’ असेही म्हणतात. जुवात दोरी अडकविण्यासाठी तिला तीन ते चार खाच केलेले असतात. जमीन नांगरण्यासाठी लोखंडी फाळ लावलेला असतो. त्याला ‘जगाल’ असे कोकणात म्हणतात. यामुळे जमिनीची नांगरणी करणे, सुलभ जाते. रुमनीला धरण्यासाठी मुठ असते. ईसाड, जगाल (फाळ), रुमनी व कवळी जोडल्यावर नांगर तयार होतो. यासाठी त्याला योग्य रूप द्यावे लागते. इतकेच नव्हे, तर बैलांच्या उंचीच्या मानाने नांगराला उंची द्यावी लागते. जो शेतकरी नांगरणी करतो त्यालाच नांगर ‘खर्षित’ वा ‘मोवशित’ आहे हे तो अचूक सांगू शकतो. तसेच बैल जर नेहमीचे असतील, तर नांगर पाहिल्यावर सुतारच सांगतो की, नांगर थोडा मोवशित केला पाहिजे.

गावातील सुतारकाम करणारे कारागीर हे प्रशिक्षित नसतात. मात्र वडिलोपार्जित व्यवसाय असल्यामुळे वडील एखाद्या लाकडाला आकार कसे देतात, त्याची जोडणी कशा पद्धतीने करतात. हे पाहून शिकत असतात. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत हा व्यवसाय चालत आलेला आहे. असे करत करत त्यात ते पारंगत होतात. पूर्वी अशा बलुतेदारांना धान्याच्या स्वरूपात बलुते द्यायचे. म्हणून त्यांना बलुतेदार असेही म्हणायचे. आता परिस्थिती बदललेली आहे. माहिती तंत्रज्ञाणामुळे पारंपारिक उद्योगांचा ऱ्हास होत आहे. त्यात सुतारकाम करणाऱ्या कारागिरांना त्याचा फटका बसत आहे. तेव्हा नांगराचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने शेती करावीच लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -