Friday, July 5, 2024

मायमराठी

‘आज दुपारी जेवणाला मटकीची उसळ आणि गरम पोळ्या आहेत, बघ कसे मस्त करकरीत मोड आले आहेत मटकीला’… बायको.
आज जेवायला काय करू?.. या प्रश्नातून एक दिवस सुटका म्हणून बरं वाटलं… तसाही, हा प्रश्न निरर्थकच, समोरच्या पक्षाला तुमचं उत्तर अपेक्षित नाही. चेहेरा होकार, निर्विकार किंवा Comply to owner of service provider अशा अर्थाचा ठेवणे आणि घोषित केलेला आजचा मेनू ऐकणे.
पण ‘करकरीत’ या शब्दाने जरा खमंगपणा आला.
काही शब्द असे की, ज्यांच्या फक्त उच्चाराने त्या वस्तूचा साक्षात साक्षात्कार समस्त पंचेंद्रियांना एकाच वेळी व्हावा ही किमया फक्त मायमराठीचीच!!!
चरचरीत, रसरशीत, कुरकुरीत, फडफडीत, खुसखुशीत, झणझणीत, चटकदार, खमंग… हे सर्व शब्द… स्पर्श, रूप, रस, गंध सगळ्यांचीच जाणीव एकत्रितपणे देऊन जातात…!!!
काही क्रियादर्शक – फणफणत… तणतणत… खणखणीत… सणसणीत…
वेळ – झुंजूमुंजू… कातरवेळ… दिवेलागण…
आता स्पर्शच बघा – सुळसुळीत… लिबलिबीत… गुळगुळीत… खडबडीत…
कमीत कमी शब्दात कमाल अपमान करणारा एकच
शब्द – ‘हे ध्यान’
दोन सारख्या गोष्टीतला सूक्ष्म फरक दाखवणारे – उमलणे… फुलणे… वाढणे… फोफावणे…
शाब्बास!!! या शब्दाने जी शाब्दिक खणखणीत थाप मनाच्या पाठीवर पडते, ती मजा congradulations!! मध्ये नाही.
यातल्या कशाकशाला इंग्रजी शब्द सापडतील कदाचित, पण त्यात त्या भावाचा अभाव बरं…
…असो अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेला ‘‘शब्देन संवादू’’ असे म्हणत त्रिवार नमन…

डॉ. मिलिंद घारपुरे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -