श्रीनगर (वृत्तसंस्था) : ‘मिग-२१’ या लढाऊ विमानांना वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने देशाच्या सुरक्षेत महत्त्वाचे योगदान देणारी ही विमाने आपल्या ताफ्यातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये गत्रुवारी मिग विमान कोसळले होते. त्यात २ वैमानिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीनगर हवाई तळावर तैनात हे स्क्वाड्रन फेब्रुवारी २०१९ मध्ये बालाकोटवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे चर्चेत आले. या हल्ल्यात मिग बायसन विमानाने पाकचे अत्याधूनिक एफ-१६ विमान पाडले होते. याच स्क्वाड्रनचे मिग-२१ विमान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान उडवत होते. सप्टेबर महिन्यानंतर हवाई दलाकडे मिग-२१ विमानांचे केवळ ३ स्क्वाड्रन शिल्लक राहतील. यातील प्रत्येकी एक स्क्वाड्रन दरवर्षी रिटायर केले जाईल. म्हणजे २०२५ पर्यंत मिग-२१ विमानांचा ताफा हवाई दलातून पूर्णतः हद्दपार होईल.
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गत्रुवारी सायंकाळी मिग-२१ कोसळले. त्यात २ वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाडमेरच्या भीमदा गावात अर्धा किलोमीटरच्या परिसरात या विमानाचे अवशेष कोसळले. या अपघातामुळे पुन्हा एकदा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील सोव्हियत वंशाच्या मिग-२१ विमानातील त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या होत्या.
उडत्या शवपेट्या…
मिग-२१च्या सुरक्षिततेचा रेकॉर्ड अत्यंत वाईट आहे. पण, या प्रक्रियेत विलंब होत असल्यामुळे हवाई दलाला मिग विमानांशिवाय दुसरा पर्याय नव्हता. १९६३ पासून भारतीय हवाई दलाला विविध श्रेणीतील ८७२ मिग लढाऊ विमाने मिळाली आहेत. यातील जवळपास ५०० फायटर जेट क्रॅश झालेत. त्यात २०० हून अधिक पायलट्स व ५६ सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात झाल्यामुळे मिग-२१ विमानांना उडत्या शवपेट्या व विडो मेकर म्हटले जाते.