Saturday, April 26, 2025
Homeमहत्वाची बातमीमी तोंड उघडले तर भूकंप होईल : मुख्यमंत्री

मी तोंड उघडले तर भूकंप होईल : मुख्यमंत्री

मालेगाव : अन्यायाविरोधात पेटून उठा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. मी आज काही बोलणार नाही. मात्र, समोरून जसे जसे तोंड उघडेल मग मलाही बोलावे लागेल, असा सज्जड दम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज मालेगावमध्ये आहेत. यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

आम्ही आमच्या कुटुंबाला वेळ दिला नाही. रात्रं-दिवस शिवसेनेसाठी काम केले. या मेहनतीमधून शिवसेना मोठी झाली. भाजपासोबत युती करुन आम्ही निवडून आलो. पण युतीला स्पष्ट बहुमत असतानाही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री झाले. मग हा विश्वासघात, गद्दारी कोणी आम्ही केली की तुम्ही केली, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

आम्ही गद्दारी केली असती तर राज्यभरातून समर्थन मिळाले नसते. राज्यातून आम्हाला समर्थन का मिळते याचा विचार तुम्ही करा, असेही त्यांनी ठाकरेंना सुनावले. जनतेला न्याय देणासाठी महामंडळ स्थापन करणार आहे. दादा भुसे, उदय सामंत यांच्यावर या महामंडळाची जबाबदारी असणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीशी मैत्री नको ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. मात्र उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी मैत्री करुन मुख्यमंत्री पद मिळवले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, मी यासंदर्भात अनेकवेळा उद्धव ठाकरेंसमोर भूमिका मांडली होती. मात्र आमच्याकडे दुर्लक्ष झाले. ठाकरेंनी आमची भूमिका समजून घेतली नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि दिघेंच्या विचारांवर पुढे जात आहोत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अतिवृष्टीचे पंचनामे १०० टक्के पूर्ण झाले आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

धर्मवीर सिनेमा काही लोकांना रुचला नाही. पचला नाही, मी आज जाहीरपणे बोलणार नाही. आज ज्या मुलाखतीचा सपाटा चालू आहे त्यावरही मी बोलणार नाही. तुम्ही आमचे आई-बाप का काढता? ज्या दिवशी माझी मुलाखत होईल, त्यावेळी भूकंप होईल, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

आनंद दिघे यांच्याबाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार, वेळ आल्यावर बोलणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर शिवसेना नेते आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद आणखीच चिघळू लागले आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर भाष्य करणार असल्याचे सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. मी ज्यावेळी मुलाखत देईल तेव्हा भूकंप होईल, असा इशारा शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -