Wednesday, May 14, 2025

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गचे सुपुत्र होणार भारताचे सरन्यायाधीश

सिंधुदुर्गचे सुपुत्र होणार भारताचे सरन्यायाधीश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे येत्या २७ ऑगस्ट रोजी भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. न्यायमूर्ती लळीत हे देवगड तालुक्याचे सुपुत्र असून गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर देवगड तालुक्याच्या सुपुत्राची झालेली निवड ही समस्त देवगड आणि सिंधुदुर्गवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट ठरणार आहे.


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय लळीत यांचे मूळ गाव विजयदुर्गनजीक गिर्ये हे आहे. आजही आठ ते दहा लळीत कुटुंब या गावात वास्तव्य करत आहेत. सुमारे २०० वर्षांपूर्वी लळीत कुटुंबाचे काही कारणाने कुंभवडे, पेंढरी, हरचेली चुना कोळवण तसेच रायगड जिल्ह्यातील रोहाजवळ आपटे या गावी स्थलांतर झाले. लळीतांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत आलेली आहे. ते १९७४ ते ७६ या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.


न्यायमूर्ती उदय लळीत हे १३ जुलै २०२० रोजी पद्मनाभ स्वामी मंदिराचा कारभार पाहण्याचा त्रावणकोर राजघराण्याचा अधिकार कायम ठेवणाऱ्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते. १३ ऑगस्ट २०१४ पासून ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत. २७ ऑगस्टला ते भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. देवगडच्या सुपुत्राची देशाच्या सर्वोच्च पदावर झालेली निवड अभिमानाची गोष्ट आहे.

Comments
Add Comment