पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी १७३ पैकी ४६ जागा ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. या आरक्षणामुळे अनेक माजी नगरसेवकांना धक्का बसलेला आहे. विशेषतः यामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या नगरसेवकांना त्यांच्या ऐवजी घरातील महिलेला संधी द्यावी लागणार किंवा प्रतिष्ठा पणाला लावून दुसऱ्या प्रभागात उमेदवारी मिळवावी लागणार आहे.
या सोडतीमध्ये शनिवार पेठ, नवी पेठ प्रभाग क्रमांक १७ मध्ये तीन पैकी एक जागा ओबीसी महिला, दुसरी सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित आहे. तर तिसरी जागा खुल्या गटात असल्याने ओबीसी पुरुषाची अडचण झाली आहे. त्याचा फटका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना बसण्याची शक्यता आहे.
हीच स्थिती प्रभाग क्रमांक १६ मध्ये असल्याने दीपक पोटे यांना अडचण होणार आहे. या प्रभागात महिलांमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच असणार आहे. प्रभाग क्रमांक ३७ जनता वसाहत दत्तवाडी मध्ये एक जागा अनुसूचित जातीसाठी, दुसरी जागा ओबीसी महिला व तिसरी जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहे.