नवी दिल्ली : लोकसभेत शुक्रवारी देखील गोंधळाचे वातावरण होते. सलग दुसऱ्या दिवशीही गोंधळ कायम असल्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. परंतु, त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारपर्यंत कामकाज तहकूब केले.
लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केल्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला होता. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. त्यानंतर आजही गोंधळ सुरुच असल्याने सभागृह सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले. अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलेले स्पष्टीकरण भाजपने फेटाळून लावले होते. दुसरीकडे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत केलेली सोनिया गांधींच्या माफीनाम्याची मागणी काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली. स्मृती ईराणींनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली. यासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. एकंदर सत्ताधारी आणि विरोधकांच्या मानापमान नाट्यामुळे लोकसभेच्या कामकाजाचे महत्त्वाचे तास वाया गेल्याचे चित्र आहे.