मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास असलेल्या ४८ टोलेजंग इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने डीजीसीएच्या आदेशाचे तातडीने पालन करण्यास सांगितले आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या इमारतींबाबत हे आदेश आहेत. या इमारतींचे ते भाग पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत, ज्यांची उंची परवानगी मर्यादेपेक्षा जास्त आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या आदेशाचे पालन करून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ४८ उंच इमारतींचे भाग तातडीने पाडण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठराविक उंचीपेक्षा जास्त बांधकाम केलेले भाग पाडण्यात येणार आहेत. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने ही जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर थोपवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिकार्यांवर ताशेरे ओढले. तसेच, या धोकादायक इमारतींबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असेही सांगितले. ज्या इमारतींना उंचीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे, त्या इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याच्या सूचनाही न्यायालयाने अधिकाऱ्यांना केली आहे.