माणगाव (प्रतिनिधी) : जगाच्या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठे मागे पडू नये, असे सर्वंकष शिक्षण संस्थांनी द्यावे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी यांनी बाहेर कुठेही शिक्षण घेतले तरी आपल्या मातृभूमीला विसरू नये, असे आवाहन माजी खासदार भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केले.
माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व विशाल परब मित्रमंडळ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विशाल परब, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोरये, संस्था अध्यक्ष सगुण धुरी, दादा साईल, मोहन सावंत, माणगाव सरपंच जोसेफ डोन्टस आदी उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी निलेश राणे यांनी माणगाव हायस्कूल व महाविद्यालयास भेट देऊन तेथील इमारतची पाहणी केली. तसेच संस्था चालकांशी चर्चा केली. या कार्यक्रमात विशाल परब यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातील किस्से सांगताना माणगाव खोऱ्यातील विद्यार्थी यांच्या पाठीशी ठाम असल्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे उद्घाटन निलेश राणे यांनी दीप प्रज्वलन करून केले. यावेळी माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांनी त्यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने १०५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांनी, तर आभार संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी वि. न. आकेरकर यांनी मानले.