संदीप जाधव
बोईसर : पालघर जिल्ह्यात ६५ जिल्हा परिषदेच्या शाळा धोकादायक स्थितीत असल्याची बाब समोर आली आहे. या शाळांमधील सुमारे शंभर वर्गखोल्या दुरवस्थेत असून त्या कधीही कोसळतील, अशी स्थिती आहे. अलीकडेच डहाणू तालुक्यातील पळे बोरीपाडा जिल्हा परिषदेची धोकादायक शाळा अतिवृष्टीमुळे कोसळल्यानंतर जिल्ह्यातील धोकादायक शाळांच्या इमारती व त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाची अबाळवस्था दिसून आल्यानंतर आता शाळांच्या दुरवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेतील शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे अलीकडेच निदर्शनास आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात असताना, दुसरीकडे शाळा इमारतीमधील वर्गखोल्या धोकादायक व वापरण्यायोग्य नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आ वासून उभा आहे.
निर्लेखनाची मंजुरी मिळालेल्या तसेच मंजुरी मिळणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थी शिकत नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्या तांत्रिक विभागामार्फत देण्यात आली नसली, तरी प्रत्यक्षात अनेक धोकादायक शाळांमध्ये शेकडो विद्यार्थी आजही शिकत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा गहन मुद्दा उपस्थित होत आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सुरक्षित भवितव्यावर टांगती तलवार आहे. शिक्षण विभाग कोट्यवधी रुपयाचा खर्च या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दर वर्षी करत असते. मात्र त्यानंतरही विद्यार्थी असुरक्षितच आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत केलेल्या सर्वेक्षणामध्ये धोकादायक शाळांची ही माहिती समोर आली आहे. या शाळा अत्यंत धोकादायक असून त्या निर्लेखीत (पाडण्यासारख्या) करण्यासाठीचे प्रस्ताव शिक्षण विभागाच्या तांत्रिक विभागामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आले आहेत, तर काही शाळाना निर्लेखीत (पाडण्याची) करण्याची मंजुरी प्राप्त झाली आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत शाळा उभारणीसाठी किंवा वर्ग खोली दुरुस्तीसाठी आवश्यक तसा निधी प्राप्त होत नसल्यामुळे दिवसेंदिवस शाळांमधील धोकादायक वर्ग खोल्यांची संख्या वाढत चालली आहे. तुटपुंज्या निधीतून आवश्यक त्या शाळा व वर्गखोल्यांची दुरुस्ती करणे अशक्यप्राय आहे. त्यासाठी अधिकच्या निधीची आवश्यकता आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये काही ठिकाणी दुरवस्था झालेल्या वर्ग खोल्यांमध्येच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. अजूनही शासकीय शाळांच्या शिक्षणाचा दर्जा व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी यांचा दर्जा सुमारच आहे. दुरवस्थेत सापडलेल्या वर्गखोल्या कोसळून एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रशासन जागे होणार आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. धोकादायक वर्ग खोल्या कधीही विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे प्राधान्यक्रमाने त्या दुरुस्त करण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. तसेच अलीकडेच पालघर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील शाळांना संरक्षण कुंपण भिंत घालण्यासाठी मोठा निधी प्राप्त केला आहे. हा निधी कुंपण भिंतीला वापरण्यापेक्षा नादुरुस्त वर्गखोल्यांना वापरल्यास विद्यार्थ्यांना वर्गामध्ये सुरक्षित शिक्षण घेता येईल, असे सांगितले जाते.
निर्लेखनाचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडे
जिल्ह्यातील विक्रमगड, डहाणू, वसई, तलासरी, वाडा अशा तालुक्यातील ३३ शाळांमधील ३४ इमारतीतील ६५ वर्गखोल्यांना निर्लेखनाची मंजुरी मिळालेली आहे, तर ३२ शाळांमधील ३९ इमारतीच्या ६९ वर्ग खोल्यांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेत शाळांमधील नादुरुस्त व धोकादायक वर्ग खोल्या यांचे युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. दुरुस्तीसाठी निधी कमी मिळत असला, तरी अधिका अधिक निधी विविध मार्गाने प्राप्त करून शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव मार्गी लावले जात आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे.- ज्ञानेश्वर सांबरे, सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद पालघर