महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सहकार रुजला, वाढला, फावलाही. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात सहकार कसा वाढला. त्याचे सकारात्मक परिणाम गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत आर्थिक सक्षमतेसाठी कसा उपयोग झाला हे आपण सारेच पहात आलोय; परंतु कोकणात सहकार हा जिल्हा सहकारी बँक, खरेदी विक्री संघ अशा काही चौकटीतच सहकार दिसला. सहकारात काम करणाऱ्यांनीही बँक, खरेदीविक्री संघ या पलिकडेही सहकार असतो हे पाहिलं नाही की कोकणातील मानसिकतेच्या परिणामाने सहकाराच्या क्षितिजाकडे पाहण्यासाठी मन ही कधी धजावले नसावे कारण काहीही असो; परंतु सहकार वाढायला हवा होता; परंतु तो विचारच आपल्याला कधी पटला नाही. याचे मूळ कारण कोकणातील मनुष्य स्वभावात असण्याची शक्यता अधिक आहे. अतिचिकित्सकपणा आणि आपणालाच अधिक कळतंय अशी मनाची असणारी समजूत यामुळे नव्या वाटेने कोणी चालायचा प्रयत्न केला की फुटपट्टी घेऊनच माप काढण्यात अधिक धन्यता मानली गेली. त्याचा परिणामही कदाचित तो असावा; परंतु ग्रामस्थांतील परस्परातील संवादातून शैक्षणिक संस्थामार्फत उभ्या राहिल्या. पूर्वीच्या पिढीने दूरदृष्टीने विचार करून गावोगावी शासनाकडून अनुदान नसतानाही प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. म्हणूनच गेल्या सत्तर वर्षांत कोकणातील त्या त्या काळातील तरुण-तरुणी शिक्षण घेऊ शकले. शिक्षण हवे याची जाण आणि समज कोणताही स्वार्थी हेतू न ठेवता शिक्षणासाठी काम करणारी एक पिढी होती. संस्था आपल्या कुटुंबाच्या ताब्यात असावी असा स्वार्थी हेतू त्या काळी नव्हता. गावातील साधारण शिकलेले, अशिक्षित असे सर्वजण एकत्र येत आणि ज्याला जमेल ते योगदान देऊन संस्था उभ्या करीत. आताचे शिक्षणसंस्था चालकांना आयत्या उभ्या झालेल्या, बिनकष्टातून संस्था हातात आल्याने आपलीच माणसं संस्थेवर असली पाहिजे. मग त्यांना काही कळलं, समजलं नाही तरी चालेल अशा मानसिकतेतून संस्थांची प्रगती काही होऊ शकली नाही, असे एक विदारक चित्रही आपणाला पाहायला मिळते. त्याकाळी शिक्षणाची सुविध करण्याचा विचार जरूर झाला; परंतु पाण्याचा विचार केला गेलाच नाही असे नाही; परंतु त्याचे निटसे नियोजन पूर्वी आणि आताही होताना दिसत नाही. कोकणात दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो; परंतु या पडणाऱ्या पावसाचे पाणी नद्या नाल्यांना आलेल्या पुरातून समुद्राला मिळते. कोकणात पडणारा पाऊस आणि वाहणारे पाणी कोकणातील ग्रामस्थ वर्षानुवर्षे पाहत आलेत; परंतु हे पाणी अडवल पाहिजे, जिरवल पाहिजे. त्यासाठी मध्यम, मोठे, लघू पाटबंधारे प्रकल्प उभे झाले पाहिजेत. हा विचार होताना दिसत नाही. कोणी तसा सकारात्मकतेने विचार केलाच तर मग नेहमीचा विरोधासाठी विरोधाचा फंडा सुरू होतो. यात मग ‘सारच मुसळ केरात’ अशी स्थिती होऊन जाते. कोकणातील सर्वच पाटबंधारे प्रकल्प या ना त्या कारणाने थांबले आहेत. काही प्रकल्पांना तर तीस-चाळीस वर्षे रखडलेले आहेत. मध्ये मध्ये निधीच टॉनिक देऊन प्रकल्पांचे काम सुरू करण्याचेही प्रयत्न झाले; परंतु आता दिला जाणारा निधी हा फारच तुटपुंजा आहे. मागील दोन वर्षांत कोरोनाने तर निधी नसल्याने कामच ठप्प झाली आहेत. जो निधी उपलब्ध करून दिला जातो त्यातून काहीच होणारे नसते. ज्या प्रकल्पांचे ९० टक्के कामं पूर्ण झाली आहेत त्या प्रकल्पांचीही काम रखडली आहेत.
कारण प्रकल्प पूर्ततेसाठी शेवटच्या टप्प्याचा निधी आवश्यक आहे. तो देण्याची मानसिकता नाही. मागील अडीच वर्षांत उर्वरित महाराष्ट्राला कसे अन्यायकारक निधी वाटप झालंय हे उभ्या महारा्ष्ट्राने पाहिलंय. तत्कालीन उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी बारामतीसह पुणे जिल्ह्यात शेकडो कोटींचा निधी कसा वळवला हे पाहिलं आहे. त्यात कोकण, विदर्भावर वर्षानुवर्षे अन्यायच होत राहिला आहे. इतरांना जुजबी निधी द्यायचा आणि आपल्या भागाकडे सर्व निधी न्यायचा हे पश्चिम महाराष्ट्राचे फार पूर्वीपासूनचे राजकारण आहे. इतक्या वर्षानंतरही त्यात फार काही बदल झालेला नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तेवढाच अभ्यासू आणि राजकीय ताकदवान नेता असेल तर प्रथम कोकणाला देऊनच नंतर आपल्या भागाकडे नेता येत होते. तेवढे राजकीय वजन असेल तरच ही बाब शक्य होणारी असते. मात्र, या साऱ्याचा परिणाम कोकणातील पाटबंधारे प्रकल्पांची कामं रेंगाळली आहेत. जर पाटबंधारे प्रकल्पांची कामं पूर्ण झाली, तर निश्चितपणे कोकणातही पिण्याच्या पाण्याची समस्या आणि कृषि क्षेत्रातही चित्र बदलू शकते. कोकणातील तरुणांना शेतीत काम करायला नको हे पूर्वीच चित्र आज उरलेलं नाही. तर कोकणातील शेतात राबणारे अनेक तरुण चेहरे आज दिसत आहेत. काजू, आंबा, नारळ, सुपारी बागायती करून प्रगतिशिल शेतकरी होत आहेत. भातशेतीतही नवीन भातबियाणी आणि नवतंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रातही आधुनिकतेतून आर्थिक समृद्धी आणण्याचा प्रयत्न होत आहे. पूर्वी जरी सहकार रुजला नाही तरी अलीकडे भागीदारीत व्यवसायाचा एक नवा प्रयत्नही होताना दिसत आहे. मात्र, या सर्वात पाणी हा मुद्दा आत्यंतिक महत्वाचा आहे. पावसाळी हंगामात चोहीकडे दिसणारे पाणी, हिरवळ मार्च नंतर जे विदारक चित्र होते. पाण्याचा शोध सुरू होतो ते थांबवायचे असेल तर लघू, मध्यम आणि मोठे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण व्हायलाच पाहिजेत. ती कोकणची गरज आहे. पाणी हा काही राजकिय ‘इश्यू’ होऊ शकत नाही. तो सर्व समाजाचा प्रश्न आहे. पाण्याने समृद्धी तर येईलच; परंतु डोळ्यातील पाणी थांबेल आणि चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहेल. तोच कोकणसाठी सुदिन ठरेल.
संतोष वायंगणकर