माथेरान : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी माथेरान मध्ये संबंधीत अधिकारी वर्गांच्या देखरेखीखाली ई- रिक्षाची चाचणी घेण्यात आली. यावेळी नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे उपस्थित होते. तसेच यावेळी नागरिक मोठया संख्येने ई रिक्षाच्या स्वागतासाठी दस्तुरी नाक्यावर उपस्थित होते.
यावेळी एकूण पाच कंपन्यांच्या ई -रिक्षा चाचणी करिता दाखल झाल्या होत्या. सध्यातरी तीन महिने या रिक्षांचे परिक्षण घेवून अभिप्राय सनियंत्रण समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासक सुरेखा भणगे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तर या रिक्षांमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. आम्ही या चाचणीच्या सुरक्षेसाठी आलो असून इथे ज्या ज्या ठिकाणी चढउतार आहेत त्यावरून ही रिक्षा कशाप्रकारे तग धरू शकते, याची सविस्तर माहिती वरिष्ठांना लवकरच देणार आहोत, असे आरटीओ अधिकारी चंद्रकांत माने यांनी सांगितले.
या सर्व प्रक्रियेत दहा वर्षांपासून अविरतपणे पाठपुरावा करून रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार आणि अन्य सदस्यांच्या सोबतीने यशस्वीरित्या या ई रिक्षाच्या चाचणी पर्यंत मजल मारणाऱ्या याचिकाकर्ते सुनील शिंदेंच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. या रिक्षांचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे आबालवृद्ध मंडळींना घेता येणार आहे. यावेळी आरटीओ अधिकारी चंद्रकांत माने, आरटीओ पनवेल सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजय कराळे, संजय पाटील, डीवायएसपी कर्जत पीसीबी सागर किल्लेदार, आर. एस. कामत, प्रभारी पोलीस निरीक्षक शेखर लव्हे आणि ई रिक्षाचे याचीकाकर्ते सुनील शिंदे, यासह माजी लोकप्रतिनिधी, विविध मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी, व्यापारी वर्ग उपस्थित होते.