Tuesday, October 8, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमंकीपॉक्स रोखण्यासाठी दक्ष राहण्याचे आयुक्तांचे निर्देश

मंकीपॉक्स रोखण्यासाठी दक्ष राहण्याचे आयुक्तांचे निर्देश

परदेशातून आलेल्या नागरिकांवर महानगरपालिका ठेवणार लक्ष

नवी मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना संक्रमणातून काहीसे सावरत असतानाच आता मंकीपॉक्स या नव्या आजाराचे संकट जगासमोर उभे ठाकले असून जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केलेले आहे. या आजाराचा रुग्ण महाराष्ट्र राज्यात अद्याप सापडलेला नसला तरी केरळ व दिल्ली येथे एकूण ४ रुग्ण आढळलेले आहेत.

या पार्श्वभूमीवर मंकीपॉक्सचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आधीच खबरदारी घेणे आवश्यक असून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाची बैठक घेत परदेशातून नवी मुंबईत आलेल्या नागरिकांची माहिती घ्यावी व त्यांची आरोग्य स्थिती जाणून घ्यावी असे निर्देश दिले आहेत. त्या आनुषंगाने महानगरपालिकेच्या २३ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत त्यांच्या कार्याक्षेत्रातील परदेशातून आलेल्या नागरिकांच्या घरी भेट दिली जाणार आहे.

पावसाळ्यात होणाऱ्या आजारांची लक्षणे साधारणत: सारखीच असल्याने मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत नागरिकांना माहिती असावी, या दृष्टीने व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही आयुक्तांमार्फत देण्यात आल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे उपस्थित होते.

ऑर्थोपॉक्स व्हायरस या विषाणूमुळे मंकीपॉक्स आजार होतो. अंगभरून ताप येणे, डोके दुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा जाणवणे, घाम येणे, अंगावर पुरळ येणे, कानामागे अथवा काखेत लसिका ग्रंथींना सूज येणे अशी लक्षणे मंकीपॉक्सच्या आजारात जाणवत असून लागण झाल्यानंतर साधारणत: ६ ते १३ दिवस इतका मंकीपॉक्स आजाराचा कालावधी आहे. अंगावर पुरळ उठण्यापूर्वी १ ते २ दिवस आधीपासून ते त्वचेवर येणाऱ्या फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा त्या पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत मंकीपॉक्सचा संसर्ग कालावधी आहे.

या आनुषंगाने पालिकेमार्फत जलद पावले उचलावीत व मंकीपॉक्सबाबत नागरिकांना माहिती होण्यासाठी त्याची लक्षणे तसेच तो खबरदारीच्या दृष्टीने जनजागृतीवर भर द्यावा, नागरिकांसारखेच खासगी डॉक्टरांनाही याविषयी माहिती करून द्यावी, असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -