Wednesday, July 2, 2025

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० जुलैपासून राज्याच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० जुलैपासून राज्याच्या दौऱ्यावर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील ठराविक भागांचा दौरा करणार आहेत. शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर भाजपाशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदेंच्या मंत्रिमंडळात भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसला तरी ३० जुलैपासून मुख्यमंत्री शिंदे पूरग्रस्त भागाची पाहाणी आणि इतर लोकोपयोगी कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत, असे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले.


३०, ३१ जुलै आणि २ ऑगस्ट या दिवशी एकनाथ शिंदे मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री औरंगाबाद, सिल्लोड, येवला, वैजापूर पुणे या भागात स्थानिक पातळीवरचे प्रश्न ऐकून, सर्व घटकातील समस्या आणि निवेदनदेखील स्वीकारणार आहेत. मुख्यमंत्री हे आधी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत आढावा घेतील. याचप्रमाणे विकास कामातील आढावा, कार्यकर्ता मेळावादेखील होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.


दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे हे सातत्याने सांगत आहेत की ते अजूनही शिवसेनेतेच आहेत. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिंदे गटातील आमदारांवर कायम टीका करताना दिसतात. अशा परिस्थितीत राज्यभर फिरून सामान्य जनता आणि सर्वसामान्य शिवसैनिक यांच्याशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन करणे हा शिंदे यांचा मुळ हेतु असल्याची चर्चा रंगली आहे. या दौऱ्यात अब्दुल सत्तार यांच्या भागात एक मेळावा होणार आहे. संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री मुक्काम करतील त्यावेळी शिंदे गटाचा नव्हे तर शिवसेनेचा मेळावा होणार आहे, असे उदय सामंत यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून, शिंदे गट हा शिवसेनाच असल्याचे बिंबवण्याचा आणखी एक प्रयत्न शिंदे गटाकडून केला जाईल असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >