मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर आणि भाचे वरुण सरदेसाई यांचा संदर्भ देत टीका केली आहे. “वाह! उद्धवसाहेब!! अखेर तुम्ही ‘पाटणकर’ आणि ‘सरकारी भाचा’ यांच्याबद्दल स्पष्टच बोललात,” अशा कॅप्शनसहित नितेश यांनी हा व्हीडिओ शेअर केलाय. तसेच कॅप्शनच्या शेवटी त्यांनी, ‘मानलं तुम्हाला’ असं माजी मुख्यमंत्र्यांना म्हटले आहे.
या क्लिपमध्ये उद्धव ठाकरे हे, “तुझं तेही माझं, माझं तेही माझं. याचं तेही माझं. त्याचं तेही माझं. माझं ते माझं आणि तुझं ते माझं इथपर्यंत होतं. आता याचंही माझं आणि त्याचंही माझं इथपर्यंत त्यांची हाव गेलेली आहे,” असे म्हणताना दिसत आहेत.
वाह! उद्धव साहेब!!
अखेर तुम्ही “पाटणकर”आणि “सरकारी भाचा” बद्दल स्पष्टच बोललात!मानलं तुम्हाला!! pic.twitter.com/3EKkmHLZLJ
— nitesh rane (@NiteshNRane) July 26, 2022
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारणाऱ्या ३९ आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच थेट मुलाखतीच्या माध्यमातून बंडखोरांबरोबरच त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपवर टीका केली आहे. ही मुलाखत मंगळवारी प्रकाशित झाल्यानंतर या मुलाखतीमधील ११ सेकंदांची क्लिप शेअर करत नितेश राणेंनी या मुलाखतीवरून खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.