Friday, December 13, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकरिअर अर्धवट राहिलेल्या महिलांनो पुन्हा नवीन सुरुवात करा

करिअर अर्धवट राहिलेल्या महिलांनो पुन्हा नवीन सुरुवात करा

अनेक मुली लग्नाआधी उच्च शिक्षण, नोकरी, व्यवसाय स्वतःच्या पायावर उभे राहणे यासाठी अतोनात प्रयत्न करतात तसेच त्या दृष्टीने वाटचाल देखील करतात; परंतु काहीना काही कारणास्तव त्यांचे स्वप्न अपुरे राहाते आणि त्यांना करिअरबाबत स्वतःच्या मनाशी तडजोड करावी लागते.

जास्त करून, लग्नानंतर मुलींना महिलांना आपले शिक्षण अर्धवट सोडणे, इच्छा असून पण पूर्ण न करता येणे, शिक्षण पूर्ण असेल तरी नोकरी व्यवसाय करायला परवानगी न मिळणे अथवा तशी घरात परिस्थिती नसणे या समस्यांना सामोरं जावं लागत. काही ठिकाणी लग्नानंतर देखील करिअर सुरळीत सुरू असेल तरी मूल-बाळ जन्माला आल्यावर, त्याची जबाबदारी, संगोपन यामुळे महिलांनाच माघार घेऊन मुलांच्या, घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आपल्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागते.

एकदा का मुलांचं संगोपन आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की, महिला कितीही बुद्धिमान, हुशार असो. तिला आलेल्या परिस्थितीला शरण जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यातून प्रयत्न केलाच तर गृहकलह, क्लेश, मनस्ताप, कामाचा अतिरिक्त वाढू शकणारा व्याप या सगळ्यांत तिचा निभाव लागणे कठीण होते. त्यातूनही मार्ग काढलाच तर तिची इतकी ओढाताण होते की ती स्वतः कंटाळून माघार घेते आणि गप्प बसते.

बालपणापासून आई-वडिलांनी शाळा, कॉलेजसाठी भरलेली फी, आपण अभ्यासासाठी केलेली धावपळ, मेहनत लक्षात घेता महिलांना ही सल आयुष्यभर बोचत राहाते की ते सगळे व्यर्थ गेले. स्वतःचं घरातलं अस्तित्व, आर्थिक स्वातंत्र्य, आपले हक्क, अधिकार, मनाविरुद्ध आपण केलेला त्याग यातून महिला मानसिकदृष्टीने खचत जाऊन सतत कुढत राहते. तरीही अशा कोणत्याही कारणास्तव आपले करिअर, शिक्षण, नोकरी, व्यवसाय हे ध्येय अद्याप पूर्ण झालेले नसेल, तर आजही आपण आपल्या आवडत्या विषयात भरारी घेऊ शकता. मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो, त्यामुळे कोणत्याही वयात नवीन काहीही आत्मसात करायला वयाचं कोणतंही बंधन नसतं हे आवर्जून लक्षात घ्या. आपल्या घरच्यांना, आपल्या मुलांना विश्वासात घेऊन आपण आपले अपुरे स्वप्न आणि उर्वरित ध्येय नक्कीच पूर्ण करू शकतो, हा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण करा.

महिलांनी स्वतःहून स्वतःला प्रोत्साहित करणे, स्वतःहून सेल्फ मोटिवेट होणे, वर्षानुवर्षे आपल्या बुद्धीला, सक्षमतेला लागलेला गंज काढून टाकणे अनिवार्य आहे. संसारात गुरफटल्यापासून रोजच्या त्याच त्याच दैनंदिन नित्य जबाबदाऱ्या पार पाडताना मरगळून आणि थकून गेलेलं आपलं खरं व्यक्तिमत्त्व, आपला बौद्धिक आवाका, आपली हुशारी, आपले ज्ञान आपल्यात दडलेल्या अनेक कला पुनश्च जागृत होणे आवश्यक आहे.

हे सर्व करण्यासाठी अथवा करताना कोणालाही दुखावून, दोष देऊन किंवा वाद घालून करण्याची काहीही आवश्यकता नसते. आपला हेतू शुद्ध असेल आणि प्रामाणिक भावनेने आपल्याला आपली ध्येय पूर्ण करायची असतील, तर परिस्थितीला, इतरांना आणि नशिबाला दोष देत आयुष्यातला अधिक वेळ व्यर्थ घालवत बसण्यापेक्षा त्वरित कामाला लागणे उचीत राहील, असे वाटते. आपल्याला एकट्याने काही करणे अवघड वाटतं असेल तर आपण आपल्या मैत्रिणी, नात्यातील इतर महिला एकत्र येऊन काहीही शिकू शकता. शिकलेल्या असाल तर त्या ज्ञानाचा व्यावसायिक उपयोग करू शकतात, अधिक अनुभव मिळण्यासाठी छोट्या छोट्या संधी सुद्धा स्वीकारू शकतात. त्याच अनुभवाचा ज्ञानाचा वापर आपण अर्थार्जनासाठी करू शकता अथवा फक्त आणि फक्त स्वतःला स्वतःच्या मनाप्रमाणे अॅक्टिव्ह ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत हा आनंद देखील उपभोगू शकता.

एकदा बाहेरील जगात आत्मविश्वासाने वावरायला लागल्यावर आपसूकच आपण उत्साही राहू लागाल,अनुभव संपन्न होऊ लागाल आणि नवीन उमेदीने संसार प्रपंचांसोबतच आपलं काम देखील योग्य समतोल साधून, सगळ्या जबाबदाऱ्यांना सारखा न्याय देऊन करू शकाल यात शंकाच नाही.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -