Tuesday, July 16, 2024
Homeकोकणरत्नागिरीरत्नागिरीत गत वर्षीच्या तुलनेत पावसाची सरासरी घसरली

रत्नागिरीत गत वर्षीच्या तुलनेत पावसाची सरासरी घसरली

जिल्ह्यातील चार प्रकल्पांची दुरुस्ती; पाणीसाठा केला कमी

रत्नागिरी (प्रतिनिधी) : दोन महिन्यांत पडलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या ३ मध्यम प्रकल्पांपैकी एक आणि ६० लघू प्रकल्पांपैकी ४६ प्रकल्प १०० टक्के भरून वाहू लागले आहेत. गडनदी मध्यम प्रकल्पात या वर्षी पाणीसाठा कमी आहे. जिल्ह्यातील तिवरे, पणदेरी, बेर्डेवाडी, कोंडवाडीचा या चार प्रकल्पात यंदा दुरुस्तीसाठी पाणीसाठा कमी ठेवण्यात आला आहे, तर गत वर्षीच्या तुलनेत पावसाची सरासरी घसरली आहे.

जिल्ह्यात नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. या तीनही प्रकल्पांचा एकूण निर्मितीसाठा ४६६.४२ दशलक्ष घनमीटर इतका आहे, तर उपयुक्त साठा ४४४.१२ दशलक्ष घनमीटर इतका आहे. आतापर्यंत या तीनही धरणांमध्ये ३५१.३३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. गत वर्षी या तीनही मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून एकूण ३६९.९२ इतका पाणीसाठा २३ जुलै अखेर होता. नातूवाडी प्रकल्पात गेल्या वर्षी उपयुक्त पाणीसाठा २०.२५ दशलक्ष घनमीटर होता. यंदा तो १८.३८ दशलक्ष घनमीटर आहे.

गडनदी प्रकल्पात गत वर्षी उपयुक्त पाणीसाठा ६६.३८ दशलक्ष घनमीटर होता. यंदाही तेवढाच पाणीसाठा आहे, तर अर्जुना प्रकल्पात गेल्या वर्षी उपयुक्त पाणीसाठा ७२.५६ दशलक्ष घनमीटर इतका होता. शंभर टक्के साठा यंदाही आहे. नातूवाडी प्रकल्पात गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. यंदा ६० लघू प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याचा संचय केला आहे. त्यापैकी ४६ धरणे पूर्णपणे भरलेली आहे. गत वर्षीही यावेळी ही धरणे १०० टक्के भरली होती. १ जूनपासून २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १८५२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गत वर्षी याच कालावधीत २८६१ मि.मी. सरासरी नोंद झाली होती. तुलनेत कमी पाऊस झाला असला तरीही धरणांसाठी पूरक ठरला आहे.

मोठ्या नद्यांचे पाणी धरण प्रकल्पात

जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी आणि बावनदी या मुख्य नद्यांचा प्रवाह वाहतो. जगबुडी नदीचे पाणी नातूवाडी प्रकल्पात सोडले जाते. तसेच वाशिष्ठीवर फणसवाडी, शास्त्री आणि सोनवी नदीवर तेलेवाडी, काजळीवर आंजणारी, कोदवलीवर चिंचवाडी, मुचकुंदीवर मुचकुंदी आणि बावनदीच्या पाण्यावर मोर्डे धरण बांधलेले आहे.

पणदेरीच्या दुरुस्तीसाठी आराखडा बनवणार

जिल्ह्यात ६७ लघू प्रकल्प असून त्यापैकी १६ लघू प्रकल्प पाटबंधारे विभागाचे आहेत. उर्वरित पाटबंधारे विभागाचे आहेत. त्या ६७ लघू प्रकल्पांपैकी चार प्रकल्पात यंदा साठा कमी करण्यात आला आहे. त्यात तिवरे, पणदेरी, बेर्डेवाडी, कोंडवाडी यांचा समावेश आहे. पणदेरी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी आराखडा बनवण्याचे काम नाशिकच्या संस्थेला देण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -