नवीन पनवेल (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे नैनाचे अतिक्रमण अिधकारी चार मजली इमारत तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह आले असता, त्यांना शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. दरम्यान शेतकऱ्यांचा रोष पाहता नैनाच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.
पनवेल तालुक्यातील २३ गावांमध्ये नैना प्रकल्प येऊ घातलेला आहे. २०१२ ते २०२२ पर्यंत या दहा वर्षांपासून नैनाचे भिजत घोंगडे आहे. नैना प्रकल्पाला येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. गावागावांमध्ये नैनाविरोधात असंतोष पसरला आहे. तरीदेखील अद्याप तालुक्यातील गावांवर नैनाची टांगती तलवार आहे. २६ जुलै रोजी नैनाचे अतिक्रमण विभाग विचुंबे येथे तोडक कारवाई करण्यासाठी आले होते. याची माहिती नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच, त्यांनी या ठिकाणी धाव घेतली. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता.
ग्रामपंचायतची परवानगी घेऊनच ही इमारत उभी केलेली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून नैनाने पनवेल तालुक्याचा कोणता विकास केला? असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी केला. यावर नैनाचे अधिकारी निरुत्तर झाले. चार मजली इमारत पाडण्यासाठी नैनाचे अधिकारी जेसीबी व पोकलेनसह आले होते. मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
या वेळी समितीचे अध्यक्ष वामन शेळके, नामदेव फडके, राज पाटील, डिके भोपी, शेखर शेळके, वासुदेव भिंगारकर, बाळा फडके, गजानन पाटील, बबन फडके, किशोर सुरते, नीलेश वाघमारे, वामन वाघमारे, अनिल ढवळे, सुधाकर लाड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.