रत्नागिरी (हिं.स.) : परुळे (ता. राजापूर) येथील ग्रामसेवक संजय बबन दळवी (वय ४१ वर्षे) यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना आज रंगे हाथ पकडण्यात आले.
तक्रारदाराच्या राहत्या घराचा असेसमेंट उतारा तक्रारदाराच्या आजोबांच्या नावावरून त्यांच्या वडिलांच्या नावावर करून देण्यासाठी संजय दळवी यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याबाबत तक्रारदाराने गेल्या १४ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि लाच स्वीकारण्यासाठी आजचा दिवस निश्चित करण्यात आला. आज पाचल बाजारपेठेतील नारकर चाळीतील ग्रामसेवक कार्यालयात दळवी यांनी तीन हजाराची लाच स्वीकारली. त्यांना पंचासमक्ष रंगे हाथ पकडण्यात आले. तीन हजाराची रक्कम जप्त करण्यात आली. पुढील कारवाई चालू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण ताटे, आणि त्यांचे सहकारी संतोष कोळेकर, विशाल नलावडे, हेमंत पवार, राजेश गावकर यांच्या पथकाने पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केली.