रायगड (वार्ताहर) : सह्याद्रीच्या कुशीत रायगड जिल्ह्यातील मनमोहक व निसर्गरम्य पर्यटनस्थळे ही नेहमी पर्यटकांना भुरळ घालत असतात. गड किल्ले, विस्तीर्ण समुद्र किनारा ही रायगड जिल्ह्याची नैसर्गिक ओळख आहे. पण निसर्गाचा वापर देखील कुणी मनसोक्त धंदा म्हणून करत असेल तर त्यावर नियंत्रण कुणाचे? हा प्रश्न रोह्याच्या कुंडलीका नदीवर शासनाच्या महसूल नियमांना पायदळी तुडवणाऱ्या व्यावसायिकामुळे जगासमोर आला आहे.
मुळशी धरणातून कुंडलीका नदीला सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर करीत रिव्हर राफ्टींगचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. या रिव्हर राफ्टींगमुळे रायगड जिल्ह्यातील कोलाड आता सर्वश्रुत झाले आहे. पण नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र वापरण्यासाठी बळीराजा असो किंवा पाण्याची योजना असो. त्यांना पाटबंधारे व महसूल विभागाचे नियम आहेत. त्यांना फाटा देऊन गेली अनेक वर्षे हा गोरखधंदा कुंडलिकेच्या उरावर सुरु आहे.
कुंडलीका नदी क्षेत्रात केल्या जाणाऱ्या पैशासाठी सुरु असलेल्या या व्यवसायामुळे लघू पाटबंधारे विभागाला लाखो रुपयांचा कर रूपात महसूल मिळाला पाहिजे होता. परंतु नदीच्या पाण्यात जोरदार प्रवाहासोबत वाहत जात थ्रील अनुभवणाऱ्या पर्यटकांच्या रूपाने मिळणारा महसूल हा खाजगी उद्योजक मिळवत आहे. महसूल शासनाला न जाता संपूर्ण मेहनताना काही खासगी लोकांच्या हातात जातो. त्यामुळे सरकारचा लाखो रुपयाचा महसूल बुडतो आहे. याकडे लघु पाटबंधारे विभागीय अधिकारी वर्ग दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
कोलाडच्या कुंडलीका नदीत जे वॉटर स्पोर्ट्स व रिव्हर राफ्टिंग चालू आहेत ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर ? बंजी जंप ही अतिक्रमणात आहे का? मग असेल तर कार्यवाही का होत नाही? असे अनेक प्रश्न विचारले जात आहे. एका ठिकाणच्या रिव्हर राफ्टिंगवाल्यांना टॅक्स भरण्यासाठी भली मोठी रक्कम आणि दुसरा मात्र टॅक्स न भरता बेकायदेशीर लोकांच्या जीवाशी खेळतो आहे.