Tuesday, April 29, 2025

महामुंबई

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक अडचणीत

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक अडचणीत

मुंबई (प्रतिनिधी): कारागृहातील तीन आरोपींनी कथित अंमलीपदार्थ प्रकरणात गोवल्याचा आरोप एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्यावर केला असून एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील पुढील १८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

या याचिकेवर न्या. रेवती मोहिते -डेरे आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा याचिकेत नायक यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आल्याने त्यांना या प्रकरणी प्रतिवादी करण्याचे आदेश देत खंडपीठाने सुनावणी १८ ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे. आर्थर रोड कारागृहात असलेल्या मोहम्मद लतीफ शेख, मुस्तफा चर्निया आणि तनवीर अब्दुल पर्यानी या तीन आरोपींनी वकील घनश्याम उपाध्याय यांच्यामार्फत ही याचिका केली आहे.

दया नायक आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी चंदनाची तस्करी करताना पकडलेल्या एका आरोपीकडे पैशांची मागणी केली. हा आरोपी याचिकाकर्त्यांचा मित्र असल्यामुळे त्याने याचिकाकर्त्यांना नायक यांनी पैशांची मागणी केल्याची माहिती दिली. याचिकाकर्त्यांनी नायक यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर नायक यांनी आपल्याला अमली पदार्थांच्या प्रकरणात गोवल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

एसीबीने नायक यांना लाच घेताना पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेसाठी नायक बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यामुळे एसीबीने नायक यांना लाच घेताना पकडण्याची योजना रद्द केल्याचा दावाही याचिकेत केला आहे. अंमली पदार्थ प्रकरणात नायक यांनी आपल्याला गोवल्याचा आरोप याचिकेतून केला असून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

Comments
Add Comment