अमरावती (हिं.स.) : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना झाडावरून गळून पडलेल्या पाला पाचोळ्याची उपमा दिली आहे. यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. अमरावतीचे भाजप खासदार अनिल बोंडे यांनीदेखील उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याच. मात्र शिवसेनेवर ओढवलेल्या परिस्थितीवरही खोचक टीका केली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसैनिकांना पाला पाचोळा म्हटले एवढी दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली, असे अनिल बोंडे म्हणाले. तर अब पछतानेसे क्या फायदा, चब चिडीया खेत चुग गई.. अशी शायरी त्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याबाबत उद्धव ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केले, यावरही अनिल बोंडेंनी प्रतिक्रिया दिली.
अनिल बोंडे यांनी सर्वप्रथम उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या. तसेच देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद हे देवाच्या आशीर्वादाने मिळाले, असे आम्ही मानतो. फडणवीस यांनी पक्षाचा आदेश पाळला, असे उत्तर अनिल बोंडेंनी दिले. भाजपला मुंबई तोडायची आहे, असा आरोपही केला जात आहे, यावर उत्तर देताना अनिल बोंडे म्हणाले, आता ते काहीही आवई उठवतील. मराठी माणूस तोडायचाय, मुंबई तोडायचीय. पण देवेंद्र फडणवीसांनी आधीच स्पष्ट केले आहे. संपूर्ण मराठी माणसांना ते एकत्र आणणार आहेत.
टेक्सटाइल पार्क अमरावतीतच होणार
अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी येथील टेक्स्टाइल पार्क औरंगाबादला पळवले जाणार असल्याचे आरोप केले. यावर उत्तर देताना अनिल बोंडे म्हणाले, ही पळवापळवी काँग्रेसच्या काळात चालायची. आता ते होणार नाही. अमरावतीचे टेक्सटाइल पार्क अमरावतीतच होणार आहे..