मुरबाड (प्रतिनिधी) : ठाणे व पालघर जिल्ह्यातील २६३ गावे पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील ५७ व शहापूर तालुक्यातील ९२ गावांचा तर पालघर जिल्ह्यातील वाडा ६२, मोखाडा २१ व जव्हार तालुक्यातील ३० गावांचा समावेश आहे.
पर्यावरण मंत्रालय भारत सरकारतर्फे ६ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या विशेष राजपत्रात या गावांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आलेल्या या गावात रेती उत्खनन, दगड खाणी, वीट भट्टयांवर निर्बंध लागू होणार आहेत तसेच विशिष्ट प्रकारचे उद्योग उभरण्यावरसुद्धा निर्बंध येणार आहेत.
यापूर्वी २०१९ साली भीमाशंकर ईको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झाला होता. त्यामध्ये मुरबाड तालुक्यातील १५ गावांचा समावेश होता. आता पश्चिमघाट ईको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झाल्याने ही संख्या वाढली आहे. लवकरच कळसूबाई हरिश्चंद्रगड ईको सेन्सिटिव्ह झोन जाहीर होणार आहे. त्यामध्ये माळशेज घाट परिसरातील गावांचा समावेश करण्यात येणार असल्याचे समजते.
उत्तरेला तापी नदी ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या सहा राज्यात हा पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये मुरबाड तालुक्यातील ५७ गावे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
यापूर्वी भीमाशंकर अभयारण्य क्षेत्राजवळ असणाऱ्या मुरबाड तालुक्यातील पंधरा गावांचा समावेश इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील डोंगर न्हावे, जांभूर्डे, खानिवरे, साकुर्ली, नारीवली, उचले, देहरी, खोपीवली, मिल्हे, दुधनोली, उमरोळी खुर्द, दुर्गापूर, मढ, रामपूर व पळू या १५ गावातील ग्रामस्थांवर बंधने आली आहेत.