Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीट्रेलर दणक्यात पण सिनेमा फ्लॉप : शेलार

ट्रेलर दणक्यात पण सिनेमा फ्लॉप : शेलार

मुख्यमंत्र्यांना घालूनपाडून बोलणे मान्य नाही

मुंबई : राज्यातील मुख्यमंत्र्यांना जर कुणी पालापाचोळा बोलत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आता महाराष्ट्रद्रोह होत नाही का, हा राज्याचा अपमान नाही का, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत बंडखोरांना पालापोचाळा म्हटले. त्यावरून भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोणी पालापाचोळा म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले. ही मुलाखत म्हणजे ट्रेलर दणक्यात पण सिनेमा फ्लॉप असल्याची टीका शेलार यांनी केली.

विश्वविख्यात वाणीचे प्रवक्ते आणि दुसरे विस्कळीत झालेले नेते या दोघांच्या मुलाखतीपेक्षा टिझर बरा होता. या मुलाखतीवर आम्ही भाष्य केलेही नसते. पण सातत्याने भाजपला इशारा देण्याचा प्रयत्न केला गेला. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शेलार यांनी म्हटले की, ज्यावेळी मुख्यमंत्री व्हायचे होते तेव्हाही भाजपला इशारे देण्यात आले. मग मुख्यमंत्री पदावर बसले तेव्हाही भाजपला इशारे दिलेत आणि आता पायउतार व्हावे लागले तेव्हाही भाजपला इशारे दिले आहेत. इशारे आणि टोमणे मारल्यानंतर आपल्याला महत्त्व मिळेल यातून हे सगळं सुरू असल्याचे शेलार यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे यांनी आजच्या मुलाखतीत आपल्या आजारपणात सरकार पाडण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगितले होते. उद्धव यांना सहानुभूती हवी आहे, त्यासाठी ते असे बोलत असल्याचे शेलार यांनी सांगितले. तुमची सत्तेची लालसा एवढी होती की, आजारी असताना एका दिवसासाठी सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री पदाचा पदभार कुणाला दिला नसल्याची टीका शेलार यांनी केली. स्वत:च्या आमदारांना ते भेटले नाही. मंत्रालयाकडे फिरकले नाही. पण या आजारपणात ममता बॅनर्जी त्यांना भेटत होत्या. शरद पवार यांच्यासोबत बैठका सुरू होत्या, असेही शेलार यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -